न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

शंखी गोगलगाईंचा यंदाही धोका जमिनीची खोल नांगरट करा-तालुका कृषी अधिकारी शिवाजी तरळकर

Post-गणेश खबोले

 

 

लोहारा-प्रतिनिधी

मागील दोन-तीन वर्षांपासून पावसाची सुरुवात लवकर होऊन पाऊस दीर्घकाळ म्हणजेच साधारण नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत पडत असल्याने गोगलगाईस पोषक वातावरण निर्माण झाले होते.साधारणतः सात ते आठ महिने जमिनीत ओलावा राहत असल्याने गोगलगाईंच्या पिढ्यांमध्ये वाढ झाली व परिणामी गोगलगाईंची संख्या भरमसाठ वाढली. यंदाचे वातावरणही किडीस पोषक असल्याने शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार उपाययोजना करण्याचे आवाहन प्रशासनाने केले असल्याचे तालुका कृषी अधिकारी शिवाजी तरळकर यांनी केले आहे.
उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट करावी,जेणेकरून गोगलगाईच्या सुप्तावस्था नष्ट होतील. शेतकऱ्यांनी मे महिन्यात पूर्वी प्रादुर्भावित सर्व क्षेत्रातील शेतात १ ते २ फुटांचे चर काढावेत जेणेकरून गोगलगाईला जाण्यास प्रतिबंध करता येईल.गोगलगाईचे वास्तव्य मुख्यतः बांधावरील गवतावर असल्याने शेताचे बांध स्वच्छ ठेवावेत. शेताची आडवी-उभी नांगरट करून सुप्तावस्थेतील गोगलगाईना जमिनीच्या पृष्ठभागावर आणावे म्हणजे त्या सूर्याच्या उष्णतेने मरतील व पक्षी त्यांचे भक्षण करतील.
हेक्टर क्षेत्रावरील पिकांवर जसे सोयाबीन यावर गोगलगाईंचा प्रादुर्भाव होऊन बऱ्याच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यंदाही गोगलगाईंचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अशा करा प्रतिबंधात्मक उपाययोजना…

फळबागेमध्ये झाडाच्या खोडास १० टक्के बोर्डोपेस्ट (१ किलो मोरचूद १ किलो चुना १० लिटर पाण्यात) लावल्यास गोगलगाई फळबागेतील झाडावर चढत नाहीत. विविध ठिकाणी असलेल्या बोर्ड, भिती, भेगा, दगडे, बांध, नदी, नाले, ओढे, कालवा, पाणंद किंवा पाणी साचलेला सखल भाग या ठिकाणी गोगलगायी सुप्तावस्थेत असतात. त्या जमा कराव्यात साबणाच्या अथवा मिठाच्या पाण्यात बुडवून नष्ट कराव्यात.

पिकांमध्ये रोप अवस्थेतच गोगलगाईंचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी या गोगलगाईना वेळीच ओळखून त्यांच्या नियंत्रणासाठी तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे.उपाययोजनांच्या अधिक माहितीसाठी गावातील कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधावा असे लोहारा तालुका कृषी अधिकारी शिवाजी तरळकर यांनी सांगितले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे