धाराशिव भाजप जिल्हाध्यक्षपदी पुन्हा दत्ताभाऊ कुलकर्णी; आगामी स्थानिक निवडणुकांसाठी संघटनात्मक बळकटीचा निर्धार
Post-गणेश खबोले

लोहारा/प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाने आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक मजबुतीवर भर देत धाराशिव जिल्हाध्यक्षपदी पुन्हा एकदा दत्ताभाऊ कुलकर्णी यांची नियुक्ती जाहीर केली आहे. पक्षाचे प्रदेश निवडणूक अधिकारी आमदार चैनसुख संचेती यांनी अधिकृत घोषणा करत ही माहिती दिली. कुलकर्णी यांनी २०१६ ते २०१९ या कालावधीतही जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली होती. त्यांच्या कार्यकाळात भाजपने विविध निवडणुकांमध्ये भक्कम यश संपादन केले होते. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्येही पक्ष संघटनेला नवसंजीवनी मिळेल, अशी पक्षांतर्गत आशा व्यक्त केली जात आहे. दत्ताभाऊ कुलकर्णी यांचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील व माजी आमदार बसवराज पाटील या तिन्ही नेत्यांशी विश्वासाचे संबंध असून, पक्षातील विविध स्तरांमध्ये समन्वय राखण्याची त्यांची खास शैली आहे. संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांशी थेट संवाद, तसेच निवडणूक नियोजन या क्षेत्रांतील त्यांचा अनुभव पक्षासाठी मोलाचा ठरणार आहे. राजकारणाबरोबरच सहकार व उद्योग क्षेत्रातही त्यांचे कार्य लक्षणीय आहे. सिद्धिविनायक परिवाराचे संस्थापक असलेल्या कुलकर्णी यांचे दोन गूळ पावडर कारखाने आणि दहा शाखांची मल्टीस्टेट बँक सध्या यशस्वीरित्या कार्यरत आहे. भाजपच्या जिल्ह्यातील संघटनात्मक विस्तारासाठी त्यांचा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय अनुभव निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक सुसंघटित व प्रभावी होईल, अशी अपेक्षा भाजपच्या वर्तुळात निर्माण झाली आहे