राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाच्या प्रभारी अध्यक्षपदी उमाकांत मिटकर

राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाच्या प्रभारी अध्यक्षपदी उमाकांत मिटकर
नळदुर्ग/न्यूज सिक्सर
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थापन झालेल्या राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाच्या प्रभारी अध्यक्षपदी उमाकांत मिटकर यांची नियुक्ती झाली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने दि-19-4-23 च्या काढलेल्या आदेशानुसार मिटकर हे या प्राधिकरणाचे कामकाज पाहतील.पोलिसांच्या गैरकृत्यावर अंकुश ठेवणारे आणि पिडीतांना न्याय मिळवून देणारे हे प्राधिकरण सर्वोच्च न्यायालयाच्या अंतर्गत येणारी न्याय संस्था आहे.पोलिसांनी छळ केला,आपल्या पदाचा गैरवापर करून त्रास दिला,कायद्याचे पालन न करता गैरवर्तणूक केली अशा प्रकारच्या नागरिकांनी केलेल्या तक्रारींची दखल हे प्राधिकरण घेते.तसेच राज्यात एखाद्या पोलिस अधिकाऱ्यांविरोधात गंभीर आरोप किंवा तक्रार आली तर त्या प्रकरणाची स्वतःहून दखल (सुओ मोटो) घेण्याचा अधिकार प्राधिकरणास आहे.
राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे उपविभागीय पोलीस अधिकारी ते थेट पोलीस महासंचालक पदापर्यंतच्या सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याबाबत तक्रारी करता येतात त्या खालील अधिकारी व पोलिसांच्या तक्रारीसाठी राज्यात सहा विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणे आहेत.
श्री.मिटकर यांची 2017 ला या प्राधिकरणावर न्यायिक सदस्य म्हणून निवड झाली होती.त्यावेळी न्यायमूर्ती श्री.आनंद पोतदार यांच्या अध्यक्षते खालील न्यायपिठाने 4200 तक्रारी निकाली काढून पडितांना न्याय मिळवून दिला होता.त्यांच्या या समाधानकारक कामाचा अनुभव बघता प्राधिकरणातील ज्येष्ठतम सदस्य म्हणून शासनाने त्यांची प्रभारी अध्यक्षपदी निवड केली आहे.
मिटकर हे गेल्या अठरा वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.त्यांच्या आयुष्यावर अल्पावधीतच ‘बेस्ट सेलर’ ठरलेले डिव्हाईन जस्टीस हे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले आहे.यूनिस्कोच्या जागतिक स्तरावरील पुरस्कारासह त्यांना 53 राज्यस्तरीय पुरस्कारांनाही गौरविले आहे.