
रोटरी क्लब मुरूम सिटी चा पदग्रहण व चार्टर प्रदान सोहळा थाटात….
मुरूम (प्रतिनिधी)
जागतिक स्तरावर रोटरीने आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ही सेवाभावीवृत्ती निश्चितच माणसाला प्रेरणा देणारी आहे. यामुळे मनुष्य मानसिक दृष्ट्या सक्षम बनतो. आज वेळ, ज्ञान व पैसा या बाबी अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्या देण्यासाठी सर्व रोटरीचे सदस्य प्रयत्न करतात हे महत्वाचे आहे. अशा कार्यामुळे निश्चितच दैवी आनंद प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. मनुष्य सेवाभावीवृत्तीने जगला तरच आनंद मिळतो असे प्रतिपादन माजी मंत्री बसवराज पाटील यांनी केले. मुरूम येथील रत्नमाला मंगल कार्यालयात रोटरीचा पदग्रहण समारंभ व चार्टर प्रदान सोहळा आयोजित रविवारी (ता. ११) रोजी अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री बसवराज पाटील होते. प्रमुख अतिथी पदग्रहण अधिकारी माजी प्रांतपाल विष्णू मोंढे, न्यू क्लब अँडव्हायझर दिनकर अरबळे, माजी प्रांतपाल दिपक पोकळे, सहाय्यक प्रांतपाल अजित गोबारे, माजी प्राचार्य डॉ. श्रीकांत गायकवाड, रोटरीचे नूतन अध्यक्ष कमलाकर मोटे, नूतन सचिव सुनिल राठोड आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी दीप प्रज्वलन व कुंडीतील रोपट्याला पाणी घालून मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी ज्ञानदान विद्यालयातील होतकरू गरीब विद्यार्थी-विद्यार्थिनींना पाच सायकलच्या चाव्या मान्यवरांच्या हस्ते देण्यात आल्या. याप्रसंगी नूतन सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते रोटरीची पिन लावून सत्कार करण्यात आला. O श्रीकांत गायकवाड मार्गदर्शन करताना म्हणाले की, अलीकडील काळात व्यक्तीवादी व स्वकेंद्री मानसिकता वाढत चालल्याने समाज जीवन विस्कळीत होत आहे. सत्ता, संपत्ती व प्रतिष्ठेपासून वंचित असणाऱ्या समाज घटकांचे हित जोपासण्यासाठी रोटरी क्लब सारखी संस्था जगभर कार्य करीत आहे. ते अत्यंत कौतुकास्पद स्वरूपाचे ठरते. गरीबी व बेरोजगारी सारख्या ज्वलंत प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी विविध पातळीवरून समाज कार्य घडवून येणे गरजेचे आहे. संविधानामध्ये ज्या मूलभूत घटनात्मक तरतुदी केल्या आहेत. त्यामुळे आपला देश एकात्म राहू शकला आहे. आपल्या शेजारच्या देशात या ना त्या कारणामुळे अस्थिरता निर्माण होत असलेली दिसून येत आहे. डॉ. दिपक पोफळे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, आनंद ही भावना आहे तर समाधान ही वृत्ती. भावना सतत बदलणारी असते; पण वृत्ती कायमस्वरूपी असते. दु:ख संपल्यानंतर आपण आनंदी होऊ असे लोकांना वाटत असते; पण आपण आनंदी असाल तर दु:ख आपोआप कमी होईल आणि समाधानीवृत्ती ठेवली तर कितीही चांगल्या-वाईट प्रसंगांनंतरही माणूस हा आनंदीच राहील हे निश्चित. माणसाला सुख, शांती, समाधान मिळवायचे असेल तर पराकोटीची निस्वार्थवृत्ती घालवली पाहिजे. O पदग्रहण अधिकारी विष्णू मोंढे यांनी रोटरीत काम करताना जो आनंद मिळतो. तो आनंद इतर दुसऱ्या कुठल्याही कामापेक्षा निश्चितच मोठा असतो. दिनकर अरबळे, अजित गोबारे आदींनी रोटरीच्या कार्यप्रणालीबद्दल मनोगत व्यक्त केले. गोविंद पाटील, डॉ. विजयानंद बिराजदार, डॉ. महेश मोटे, डॉ. महेश स्वामी, शिवशरण वरनाळे, उल्हास घुरघुरे, डॉ. अप्पासाहेब सुर्यवंशी, प्रकाश रोडगे, कल्लय्या स्वामी, डॉ. राजेंद्र पाटील, भूषण पाताळे, मल्लिकार्जुन बदोले, शरणाप्पा धुम्मा, राजेंद्र वाकडे, शिवकुमार स्वामी कलाप्पा पाटील, मुन्ना मुंदडा आदींनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. नितीन डागा यांनी केले. सूत्रसंचालन संतोष कांबळे तर आभार सुनिल राठोड यांनी मानले. शहर व परिसरातून बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.