वाढदिवसाला घेतले तीन मुलांचे शैक्षणिक पालकत्व उमाकांत मिटकर यांचा आदर्शवत उपक्रम

वाढदिवसाला घेतले तीन मुलांचे शैक्षणिक पालकत्व
उमाकांत मिटकर यांचा आदर्शवत उपक्रम
नळदुर्ग /न्यूज सिक्सर
राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण येथे कार्यरत असलेले श्री.उमाकांत मिटकर यांनी स्वतःच्या वाढदिवशी येथील मरीआई समाजातील वडिलांचे छत्र हरवलेल्या राधिका,धर्मराज,माला या तीन मुलांचे शैक्षणिक पालकत्व घेतले.
वाढदिवस म्हटले की हार-तुरे,भला मोठा बॅनर,केक अशी प्रथा समाजामध्ये आहे परंतु मिटकर कुटुंबातील प्रत्येक सदस्य यापासून अलिप्त राहून कोणताही वायफळ खर्च न करता सामाजिक व धार्मिक कार्यात मदत करून वाढदिवस साजरा करतो.
उमाकांत मिटकर हे अनेक सामाजिक कार्यात अग्रेसर असुन सध्या ते सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थापन झालेल्या राज्य पोलीस प्राधिकरणावर काम करतात,पण ते नेहमीच जुने ते सोने याप्रमाणे सामाजिक क्षेत्रात काम केलेली जाणीव विसरत नाहीत.
नळदुर्ग येथील स्टँडच्या पाठीमागे गेल्या अनेक वर्षापासून मरिआई समाजाची वस्ती आहे.विकासापासून कोसो दूर असलेल्या या वस्तीत व समाजात सुधारणांची आवश्यकता आहे,ही गरज ओळखून मिटकर यांनी हा उपक्रम केला.कचरा डेपोत कचरा उचलत असताना या तिन्ही मुलांना गाडीत घालून चप्पल,कपडे,शैक्षणिक साहित्य,खेळणी,खाऊ दिला गेला.इतकेच नव्हे तर कटिंगच्या दुकानात जाऊन त्यांची स्वच्छता ही करण्यात आली. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाबद्दल उमाकांत मिटकर यांचे कौतुक होत आहे.
चौकट👇
सामाजिक संवेदनशीलता असणाऱ्या अनेक व्यक्तींना मी असे उपक्रम करायला विनंती करतो,प्रोत्साहन देतो मग माझ्याच वाढदिवसाला असा उपक्रम करणे ही माझी नैतिकता बनते
उमाकांत मिटकर