
धाराशिव-प्रतिनिधी
धाराशिव तालुक्यातील पोहनेर येथील रहिवासी व क्रांतिकारी विचाराचे लोकनेते राजेंद्र रामराव घोलकर यांचे दि.२८ मार्च रोजी दीर्घ आजाराने वयाच्या ७० व्या वर्षी सकाळी ७:३० वाजता निधन झाले. मागील महिनाभरापासून त्यांना श्वसनाचा त्रास जाणवत होता.त्यांच्यावर धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मागील एक आठवड्यापासून उपचार सुरू होते.दोन दिवसांपूर्वी पुन्हा प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते.बुधवारी रात्री साडेअकरापर्यंत ते नातेवाईक, आप्तांशी गप्पा मारत होते. त्यांची आस्थेवाईकपणे चौकशीही करत होते. त्यानंतर त्यांना पुन्हा श्वसनाचा त्रास जाणवू लागला.डॉक्टरांचे उपचार सुरू असताना त्यांचे प्राणोत्क्रमण झाले.
राष्ट्रीय जनता दल पक्षाचे वरिष्ठ नेते म्हणून ८० व ९० च्या दशकात राजकीय व सामाजिक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे.उस्मानाबाद तालुक्यातील केशेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी कारखाना उभारण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. तसेच एस.सी.प्रवर्गातील लोकांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता त्यांना ५१ रुपयांमध्ये कारखान्याचा शेअर देण्यात यावा असा धोरणात्मक व क्रांतिकारी निर्णय त्यांनी त्या काळी घेऊन समाजातील विषमता कमी करण्यासाठी प्रयत्न करून दलीत, वंचित तसेच समाजातील तळागाळातील लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले.
त्यांनी त्यांच्या राजकीय कार्यकाळात शेतकऱ्यांसाठी,आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय,मुस्लिम अल्पसंख्याक,दिनदलीत दुबळे व उपेक्षित लोकांच्या न्याय व हक्कासाठी विविध पातळीवर आंदोलने व मोर्चे काढून त्यांना न्याय मिळवून दिला. ओडिसा, कलकत्ता, बिहार, उत्तरप्रदेश,तसेच बंगलोर येथे
पक्षाच्या राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या बैठका,चर्चासत्रे,व अधिवेशनामध्ये त्यांचा वरिष्ठ नेते म्हणून सहभाग असायचा. केंद्रीय पातळीवर संयुक्त जनता दलाचे नेते एच.डी.देवे गौडा,रामविलास पासवान,जॉर्ज फर्नांडिस,बिजू पटनाईक,लालू यादव, येडियुरपपा, बापूसाहेब काळदाते यांसारख्या जनता दलातील वरिष्ठ नेत्याबरोबर त्यांनी काम केलेले आहे.तसेच स्थानिक पातळीवर कै.व्यंकटेश हांबिरे,डॉ.बशारत,दादासाहेब जेथिथोर,रामभाऊ कोळगे,सुधाकर शिनगारे,दिलीप गणेश हे त्यांचे सहकारी होते.
उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध पातळीवरील होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था,सहकारी कारखाने व बँका,विधानसभा व लोकसभा अशा निवडणुकांमध्ये त्यांची राजकीय भूमिका ही महत्त्वपूर्ण मानली जात असे.
राष्ट्र सेवा दलाचे श्री.पन्नालाल सुराणा व दिवंगत ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांच्यासोबत राहून त्यांनी राज्यस्तरीय संस्कार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. राजकीय उत्तरार्धात त्यांनी भूपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांना खंबीरपणे साथ दिली होती.
आयुष्यभर पक्षाशी एकनिष्ठ राहून त्यांनी निस्वार्थपणे राजकारणाच्या माध्यमातून समाजाची सेवा केली. त्यांचे वडील कै. रामराव नरसोजी घोलकर यांचा मराठवाडा मुक्तीसंग्रामात चिलवडी कॅम्प मध्ये सहभाग होता.त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी चार वाजता नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रपरिवार, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ मंडळीच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या पत्नी मीनाक्षी घोलकर ह्या ग्रामपंचायत सदस्य असून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत, त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव श्री.सचिन घोलकर हे यांत्रिकी अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन आधुनिक व प्रयोगशील शेती करत आहेत, कनिष्ठ चिरंजीव डॉ. दौलतराव घोलकर हे भानुदासराव चव्हाण महाविद्यालय, लोहारा या ठिकाणी प्राचार्य पदावर कार्यरत आहेत तर मुलगी सौ.रोहिणी घोलकर- संकपाळ उच्चशिक्षित असून जावई डॉ.बाळासाहेब संकपाळ वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत.