प्रत्येक स्त्रीने कोणावरही अवलंबून न राहता स्वकर्तृत्वाने स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करावे- प्रा.सुनिता चावला
पत्रकार-गणेश खबोले

लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये “8 मार्च जागतिक महिला दिन व 10 मार्च ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनाचे” औचित्य साधुन दि 11 मार्च 2024 रोजी समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट व प्रेरणादायी कार्य करत असलेल्या स्त्रियांचा” महिला रत्न “पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोहारा न.पं. नगरसेविका सौ आरती सतिश गिरी,प्रमूख अतिथी म्हणून नगराध्यक्षा सौ वैशालीताई अभिमान खराडे,महिला पालक प्रतिनिधी सौ अश्विनी श्याम कळसकर प्रमुख वक्त्या म्हणून श्रीकृष्ण महाविद्यालय गुंजोटी येथील प्रा.सौ सुनिता चावला,स्कूलच्या संचालिका सौ सविता शहाजी जाधव आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाईं फुले यांच्या आणि छ.शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दिप प्रज्वलन करून कऱण्यात आले.
यावेळी स्कूलच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचे स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर राजकीय क्षेत्रामध्ये माजी जि. प. सदस्या तथा सास्तुर गावच्या सरपंच सौ शितलताई राहूल पाटील, सामाजिक क्षेत्रामध्ये हिप्परगा रवा येथील श्रीमती जयश्रीताई व्यंकटराव कुलकर्णी, प्रशासकिय सेवेतील धाराशिव येथे तलाठी या पदावर नव्याने रुजू झालेल्या श्रीमती शीतल दत्तात्रय रसाळ, शैक्षणिक क्षेत्रात जि.प.कोल्हापूर याठिकाणी शिक्षिका म्हणून निवड झाल्याबद्दल श्रीमती प्रतिमा राजेंद्र गोसावी, आरोग्य क्षेत्रातील लोहारा येथील ग्रामीण रुग्णालयात कार्यरत डॉ.अदिती अप्पाराव खामितकर कौटुंबिक क्षेत्रात सौ पंचगंगा रमेश वाघुले, लोहारा येथील महावितरण कार्यालयात कार्यरत सौ वैशाली प्रकाश मुळे तसेच सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रातील शिवकरवाडी येथील श्रीमती मीरा मुकेश माने यांनी आपापल्या क्षेत्रांमध्ये अतिशय उत्कृष्ट व समाजातील इतर महिलांना प्रेरणादायी असे कार्य करत असल्याबद्दल या सर्व महिलांचे मान्यवरांच्या हस्ते “महिला रत्न पुरस्कार” देवून सन्मानित करण्यात आले. तसेच कार्यक्रमास येणाऱ्या प्रत्येक महिलांचे स्वागत मिस.ईश्वरी जमादार व सोनाली काटे यांनी गुलाबपुष्प देवून केले. यावेळी स्कुलमधील विद्यार्थ्यानी समाजात व कुटुंबात आई,बहीण,मुलगी,पत्नी,मावशी,सासू,सून,मैत्रीण अशा वेगवेगळ्या भूमिकेत असणाऱ्या महिलांना समर्पित गीत व नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली तर काही विद्यार्थ्यानी महिला दिनानिमित्त आपले विचार मांडले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्कूलचे प्राचार्य श्री शहाजी जाधव यांनी केले. स्कुलमधील शिक्षक प्रा.यशवंत चंदनशिवे आणि मिस पुजा चौरे यांनी महिला दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले.आपल्या मार्गदर्शनात प्रा.चावला मॅडम म्हणाल्या की,शासनाने महिलांना 33% आरक्षण दिले असले तरीही आजही समाजात महिलांना दुय्यम स्थान दिले जाते महिला सरपंच,नगराध्यक्षा म्हणून पदावर विराजमान होतात परंतु निर्णय मात्र पतीला विचारूनच घेतात. आपल्या घरातील मुलींना कमकुवत न बनवता तिच्या समोर येणाऱ्या प्रत्येक संकटाला तोंड देण्याची ताकत व क्षमता निर्माण करावी,यासाठी प्रत्येक आईने मुलगा मुलगी भेद न करता दोघानाही एकसमान मानले पाहिजे. मुलींनाही मुलाप्रमाणे स्वच्छंदी, मोकळे सोडले पाहिजे जेणे करून मुलीमध्येही स्वतःचे निर्णय स्वतः घेण्या इतपत समज आली पाहिजे. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा आणि मुलगी म्हणजे परक्याचं धन या मानसिकतेतून आपण बाहेर यायला हवे. प्रत्येक स्त्री, पत्नी, मुलगी आपल्या वडील,पती, यांची ओळख न दाखवता स्वतःच्या कर्तृत्वाने आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली पाहिजे जसे की भारतातील राजमाता जिजाऊ माँसाहेब,राणी लक्ष्मीबाई, पाहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी, शिक्षिका सावित्रीबाईं फुले, पंतप्रधान इंदिरा गांधी, माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील, आदिवासी कुटुंबातील सध्याच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु, अंतराळवीर कल्पना चावला,भारतीय पोलिस अधिकारी किरण बेदी यांची उदाहरणे दिली. यानंतर स्कुलमध्ये माता पालकांच्या घेण्यात आलेल्या डिश – डेकोरेशन, रांगोळी, संगीत खुर्ची या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिस अर्चना सोनके, तर आभार प्रदर्शन मिस माधवी होगाडे यांनी केले. कार्यक्रम यशास्वीरीत्या पार पाडण्यासाठी स्कुलमधील शिक्षिका मिस अनिता मनशेट्टी,सरिता पवार,चांदबी चाऊस,रेश्मा शेख,शीतल बिराजदार यांनी अथक परिश्रम घेतले.याप्रसंगी विध्यार्थी,महिला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.