
‘स्त्री’ परमेश्वरानं निर्माण केलेली अप्रतिम आणि सुंदर कलाकृती. तिच्याविषयी किती लिहावं आणि किती नको हाही मोठा यक्षप्रश्नच आहे??? तीच आई , तीच पत्नी, तीच बहीण, तीच सखी, तीच मैत्रीण, तीच संसाराचं चाक, तीच अर्धांगिनी आणि तीच सहधर्मचारिणी…. असं असतानाही हा समाज, हि कुटुंबव्यवस्था तिला कोंडमारा करून मारण्याचा प्रयत्न करते, चूल आणि मूल या रिंगणात तिला नाचवते. पूर्वीच्या काळी परिस्थिती बिकट होती, तीच जगण म्हणजे क्षणोक्षणी मरण असायचं, तिला शिक्षणाचा हक्क नव्हता, सतीप्रथा होती, तिला घरात, समाजात कोणतंच स्थान नव्हतं..तिला मान वर करून बघण्याचा देखील अधिकार नव्हता..त्या पुरुषप्रधान संस्कृतीत तिला एक उपभोगाच साधन यापलीकडे काहीच किंमत नव्हती पर्यायाने ती सुरक्षित नव्हती.
आता मनात विचार येतो कि आज तरी स्त्री सुरक्षित आहे का??तर प्रश्नाचं उत्तर मी तरी नाही असेच देईन..कारण आपण नाण्याची एक बाजू पहा, आज स्त्रियांनी कित्येक क्षेत्रे पादाक्रांत करत अवकाशात झेप घेतली आहे… महिला आज राष्ट्रपती झाल्यात, डॉक्टर झाल्या, इंजिनीअर आहेत, शिक्षिका आहेत, अंतराळवीर झाल्या , कलेक्टर झाल्या, पायलट झाल्या एवढंच नव्हे तर जगातील प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवला तोही सर्व संकटावर जिद्दीने मात करून. अशी जरी नाण्याची एक बाजू असेल तरी दुसरी बाजू खूप दयनीय आणि खूप साकल्याने विचार करण्यासारखी आहे. आज स्त्री मुक्ती वर भाषण केली जातात, रॅली काढल्या जातात, व्याखान दिली जातात पण तरीही आजची स्त्री स्वतंत्र आहे का?? आज समाजात तिचे स्थान सुरक्षित नाही…’पिता रक्षते: कौमार्य, पती रक्षते: यौवन , पुत्र रक्षते: वार्धक्य’ असे म्हणले जाते.
जन्म नको का?? पूर्वी जात्यावर दळण दळणाऱ्या आणि ‘स्त्री जन्म म्हणुनी न व्हावे उदास’ असं सांगणाऱ्या संत जनाबाईपासून ते ‘स्त्री पुरुष तुलना’ लिहणाऱ्या ताराबाई शिंदे पर्यंत प्रगल्भ आणि परिपक्व विचारांचा वारसा आपल्या भारतीय समाजाला लाभला आहे, आज विचार केला की समाजात स्वतःच स्थान निर्माण करणाऱ्या कित्येक स्त्रियांना खूप वाईट वागणूक त्यांच्या घरच्या लोकांनी दिली यामध्ये सिंधुताई सपकाळ यांचं जिवंत उदाहरण देता येईल. यमुची कादंबरी लिहणाऱ्या ‘ह. ना. आपटे नि स्त्री च्या केल्या जाणाऱ्या विदारक छळाच वर्णन त्यांच्या कादंबरीत खूप आत्मीयतेने केलं आहे, तसेच ‘चितेवरच्या कळ्या’ या कादंबरीत वसंत गायकवाड यांनीही स्त्रीच अत्यंत वाईटपणाने मिळणार मरणाच्या कहाण्या लिहल्या आहेत. समाजात आदर्श निर्माण करणाऱ्या महिलांमध्ये मदर तेरेसा, पी.टी. उषा, लक्ष्मी स्वामिनाथन, प्रतिभाताई पाटील,कल्पना चावला, सुनिता विल्यम्स अशी खूप मोठी यादी यशस्वी स्त्रियांची तयार होईल…
“स्त्री जन्मा हि तुझी कहाणी
हृदयी अमृत नयनी पाणी”
असं म्हणलं जात..प्रत्येक स्त्रीची अशी एक कहाणी आहे ज्यामध्ये प्रचंड दुःख , वेदना आणि एक आर्त किंकाळी आहे, जी फक्त मनातल्या मनात आहे, ती तडफडत आहे , घुसमटत आहे मनातल्या मनात, तिची ती आर्त हाक कुणी ऐकायला हवी.
जुन्या काळातही अहिल्या, सीता , तारा, मंदोदरी , सावित्री , मीरा ..अशा स्त्रियांची उदाहरणे दिली जातात, आजच्या काळात स्त्री जर खऱ्या अर्थाने स्वतंत्र बनवायची असेल तर तिला कौटुंबिक,सामाजिक सर्वच स्तरात मानाचं स्थान मिळायला हवे.तिच्यावर अन्याय करणारांना कठोर शिक्षा मिळायला हवी. संसाराचं एक चाक म्हणून तिला जपायला हवं, समजून घ्यायला हवं, पर्यायानं तिच्यावर होणारे अत्याचार थांबायला हवेत, तरच मुलगी हवी अशी समाजाची मानसिकता तयार होईल.
स्त्री ही वात्सल्याचा अखंड वाहता झरा आहे तो अखंड वाहतच राहील, फक्त त्याचा आनंद आपल्याला घेता यायला हवा.’जिच्या हाती पाळण्याची दोरी ती सर्व जगाते उद्धारी’ असेही तिच्या आदरासाठी म्हणले जाते. तिला न्याय द्यायला हवा, एक मैत्रिण, एक सखी, एक बहीण, एक अर्धांगिनी वाचवायला हवी…तरच समाधान नांदेल..आणि सावित्रीचा वसा जपला जाईल, सीतेला न्याय मिळेल मीरेला मान मिळेल आणि अहिल्येचा उद्धार होईल……
निर्मले सुनंदा मधुकर
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलवाडी तालुका लोहारा जिल्हा धाराशिव