ब्रेकिंगमहाराष्ट्र
कांदा निर्यात शुल्क रद्द करण्यासह २५ टक्के अग्रीम रक्कम देण्यासाठी स्वाभिमानीचा रस्ता रोको
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

कांदा निर्यात शुल्क रद्द करण्यासह २५ टक्के अग्रीम रक्कम देण्यासाठी स्वाभिमानीचा रस्ता रोको
८ दिवसांत निर्णय न घेतल्यास मंत्र्यांसह लोकप्रतिनिधींना गावात फिरू देणार नाही
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
केंद्रातील शेतकरी विरोधी भाजपा सरकारने कांदा निर्यात शुल्कावर चाळीस टक्के वाढ केली आहे. तसेच पावसाने दडी मारल्यामुळे पूर्ण पिके वाया गेली असून शेतकरी चिंतातूर झाले आहेत. त्यामुळे सरकारने कांदा निर्यातीचा घेतलेला निर्णय तात्काळ रद्द करण्यासह पीक विम्याची २५ टक्के अग्रीम रक्कम त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने तुळजापूर शहरातील मुख्य बस स्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे सोलापूर, धाराशिव, लातूर व गावातून होणारी वाहतूक ठप्प झाल्याने हे चारही रस्ते एक तास वाहनाने तुंबले होते. दरम्यान, सरकारने येत्या ८ दिवसांत याबाबत योग्य निर्णय न घेतल्यास मंत्र्यांसह लोकप्रतिनिधींना गावात फिरू देणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे यांनी दि.२२ ऑगस्ट रोजी दिला.
केंद्र सरकारने अचानकपणे कांद्यावरील निर्यात शुल्कामध्ये चक्क ४० टक्के इतकी प्रचंड मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे व्यापारी कांदा निर्यात करू शकणार नाहीत. तसेच ते कांदा साठवू देखील शकणार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याला ते भाव देखील देऊ शकणार नाहीत. परिणामी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांच्या जीवावर उठले आहे की काय ? तसेच त्यांच्या मरणाची म्हणजे आत्महत्या करण्याची वाट पाहत आहे की काय ? असा संतप्त सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनात सरकारला विचारला. पावसाने सलग २३ दिवसांपासून खंड दिल्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीनसह इतर सर्व पिके उध्वस्त झालेली आहेत. त्यामुळे पीक विमा कंपनीने २५ टक्के अग्रीम रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. शासनाने शेतकऱ्यांना अनुदान द्यावे. तर रासायनिक खतांची भाव वाढ थांबवून शेतकऱ्यांना योग्य दरात खते उपलब्ध करून देण्यात यावीत. तर शेतकरी विकत घेत असलेल्या बी-बियाणे, कीटकनाशके यावर कोणत्याही प्रकारची जीएसटी लावू नये. तसेच वन्य प्राण्यापासून पिके संरक्षित करण्यासाठी तार कंपाऊंडसाठी १०० टक्के अनुदान देण्यात यावे. शेतीसाठी सुरळीत दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा. शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमाफी करण्यात यावी यासह इतर विविध मागण्यांसाठी हा रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष धनाजी पेंदे, जिल्हा संपर्कप्रमुख शहाजी सोमवंशी, तुळजापूर तालुकाध्यक्ष दुर्वास भोसले, स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे तुळजापूर तालुकाध्यक्ष नेताजी जमदाडे, कल्याण भोसले, अनिल दणके, चंदू नरोळे, राजाभाऊ भोसले, शेषराव साळुंके, संजय भोसले, संतोष भोजणे, बाळू शेरकर, विकास गोरे, मच्छिंद्र चौगुले, तुळजाभवानी पुजारी मंडळाचे किशोर गंगणे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.