श्री तुळजाभवानी मंदिरासाठी एक हजार कोटीचा आराखडा तयार !

श्री तुळजाभवानी मंदिरासाठी एक हजार कोटीचा आराखडा तयार !
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरासाठी प्रशाद योजनेतून एक हजार कोटींचा नवा आराखडा तयार होत आहे. यातून दर्शन अधिक सुलभ करण्यासाठी तसेच भाविकांच्या वेळेची बचत व्हावी, यासाठी शिर्डी, तिरूपती देवस्थानच्या धर्तीवर बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांचा वेळ वाचेल आणि गर्दीचेही नियंत्रण होईल.
नव्या योजनेमुळे दर्शनासाठी आपला नंबर कधी येणार हे भक्तांना आधीच कळणार आहे. त्यासाठी वाहन पार्किंग परिसरातच काऊंटर पास दिले जातील. त्यावरील वेळेनुसार तासभर आधी मंदिर आवारात भाविकांना प्रवेश मिळेल. दर्शन लाईन प्रकल्पातून टप्प्याटप्याने भाविकांना थेट मंदिरात सोडले जाणार आहे. महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या तुळजाभवानी मातेच्या शक्तीपीठाला विकासाची प्रतीक्षा आहे. अलीकडच्या काळात मंदिरात वाढलेली गर्दी आणि कमी पडत असलेल्या सुविधांच्या पार्श्वभूमीवर विकास आराखडा राबविण्याची गरज व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये तुळजापुरात झालेल्या प्रचारसभेत मंदिराच्या विकासाची ग्वाही दिली होती. त्यानंतर नऊ वषार्नंतर यासंदभार्तील हालचाली सुरू झाल्या आहेत.
मंदिर संस्थानच्या नव्या विकास आराखड्याला प्रशाद योजनेतून निधी मिळणार आहे. सुरूवातीला एक हजार कोटींचा आराखडा राबविला जाईल. या आराखड्यात तुळजापुरात येणा-या प्रत्येक प्रमुख मार्गावर शहराबाहेर म्हणजे नळदुर्ग रोड, हुडको, आराधवाडी भागात पार्किंग सुविधा असेल. सध्याच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्यात येतील. त्याचठिकाणी भाविकांचे साहित्य ठेवण्याची सोय करण्यात येणार आहे. तुळजापूर शहरालगत रामदरा परिसरात उद्यान साकारले जाणार आहे. कुलस्वामिनी तुळजाभवानी माता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. शहरात येणा-या प्रत्येक प्रमुख मार्गावर आता दगडी कमानी उभारण्यात येणार आहेत. शासनाकडे प्रस्ताव पाठवून मान्यता आल्यानंतर गरजेनुसार बदल केले जातील. यापूर्वी स्व.विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना ३२५ कोटींचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा राबविण्यात आला होता. यातून तुळजापूर शहराचा पुरेसा विकास झाला नाही.
कसा असेल विकास आराखडा?
– नव्या आराखड्यात वातानुकुलित सभागृहातून दर्शनाची रांग असणार आहे.
– एकूण १० वातानुकुलित सभागृह आहेत.
– या सभागृहांची क्षमता ही एक लाख भाविक इतकी असेल.
– एका सभागृहातून दुस-या सभागृहात पाठवून भाविकांना टप्प्याटप्प्याने मंदिरात सोडले जाईल
– दर्शनाला किती वेळ लागेल हे आधीच कळणार आहे.
– वाहन पार्किंगच्या ठिकाणीच काऊंटर पास मिळेल.
– भाविकांना मंदिर परिसरात तासभर आधी प्रवेश मिळेल.
– मंदिर परिसरातील बांधकामात बदल होणार आहेत.