राष्ट्रीय युवा महोत्सवात उस्मानाबादचा डंका! अ.भा. मराठी नाट्य परिषद शाखेला उत्तेजनार्थ पारितोषिक

राष्ट्रीय युवा महोत्सवात उस्मानाबादचा डंका!
अ.भा. मराठी नाट्य परिषद शाखेला उत्तेजनार्थ पारितोषिक
उस्मानाबाद /न्यूज सिक्सर
कर्नाटकातील हुबळी-धारवाड येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय युवा महोत्सव 2023 मध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उस्मानाबाद शाखेने बहारदार कलाकृती सादर करुन उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले आहे. या यशाबद्दल नाट्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेचे सर्वत्र कौतुक होत आहे.युवक दिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई व इतर मंत्रीगणांच्या उपस्थितीत झाले होते. 12 ते 16 जानेवारी या कालावधीत झालेल्या महोत्सवात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उस्मानाबाद शाखेने ‘दिंडी लोकनृत्य’ हा कलाप्रकार सादर करुन सर्वांचे लक्ष वेधले. या कलाकृतीला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. क्रीडा व युवक कल्याण मंत्री डॉ. सी. नारायण यांच्या हस्ते संघाला पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यापूर्वी नंदुरबार येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेतही उस्मानाबादच्या संघाने स्थान चमकदार कामगिरी करुन राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले होते.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उस्मानाबाद शाखेचे अध्यक्ष विशाल शिंगाडे यांच्या नेतृत्वाखातील या संघामध्ये अंबिका आगळे, अंकिता माने, वैष्णवी नागटिळक, पौर्णिमा गायकवाड, ऋतुजा माने, श्रावणी चव्हाण, सानिया भागवत, सुहास झेंडे, सुमेध चिलवंत, दीपक राठोड, संकेत नागणे, विजय उंबरे, अक्षय दिवटे, अक्षय शेंडगे, करण पेठे, गायक सुजित माने, वादक रमण भुईभार, सागर चव्हाण, डान्स कोरिओग्राफर विशाल टोले यांचा समावेश होता.