पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण
उस्मानाबाद /न्यूज सिक्सर
भारतीय स्वातंत्रयाच्या अमृतमहोत्सव आणि येत्या प्रजासत्ताक दिनाच्या निमीत्ताने मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद शहर पोलीस ठाणे व छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या वतीने विद्यालयात विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात येउन शनिवार दि. 21.01.2023 रोजी स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मा. पोलीस अधीक्षक, श्री. अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव- श्री. धनंजय पाटील, प्राचार्य- पी.एन. पाटील, उस्मानाबाद (श.) पो.ठा. चे पोनि- श्री. उस्मान शेख, सपोनि- श्री. सुर्वे, पोउपनि श्रीमती- गोडगे, पोलीस अंमलदार- शिंदे, पाटील, पुरके, चव्हाण, जाधवर, मुगळे, भोत्रे यांसह आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मा. पोलीस अधीक्षक, श्री. अतुल कुलकर्णी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्राची निवड करुन पोलीस, डॉक्टर, वकील, अभियांत्रिकी, शिक्षण इत्यादी क्षेत्रात करिअर करावे. शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. कोविड काळामध्ये शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना मोबाईल फोनद्वारे डिजिटल माध्यमातून शिक्षण घ्यावे लागल्याने त्या काळात विद्यार्थी सोशल मीडियाशी जोडले गले. परंतु आपली वैयक्तिक माहिती जपून ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा काळजीपुर्वक वापर करावा. तसेच ओटीपी कोणत्याही अनोळखी व्यक्तीला देऊ नये असे आवाहन करुन यावर्षीपासून जिल्ह्यात डॉ. एपीजे अब्दुल कलाम फाऊंडेशनच्या माध्यमातून 15 विद्यार्थ्यांची निवड केली असल्याचेही त्यांनी सांगीतले. तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी जिल्हा पोलीस दलाच्यावतीने लवकरच स्वसंरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण वर्ग सुरु करण्यात येणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. कार्यक्रमाअंती पोनि- श्री. उस्मान शेख यांनी स्पर्धेच्या आयोजनामागील उद्देश विशद करुन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धा महत्तवपुर्ण असल्याचे सांगून विद्यार्थी- शिक्षकांचे त्यांनी आभार व्यक्त करुन देशभक्ती गीताचे गायन करुन त्यांनी उपस्थितांची मने जिंकली.