जेवळी येथे मानाच्या नंदीध्वज,पालाखीसह मिरवणूक,मंदीरासमोर अग्नी स्पर्शाचा कार्यक्रम
Post-गणेश खबोले

लोहारा-प्रतिनिधी
ग्रामदैवत महात्मा बसवेश्वरांच्या यात्रेच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी (दि १) मानाच्या नंदीध्वज, पालाखीसह मिरवणूक काढून मंदीरासमोरील मैदानात अग्नी स्पर्शाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी तळपत्या उन्हातही मोठ्या संख्येने परिसरातील भाविक भक्त उपस्थित होते.
कर्नाटक व महाराष्ट्र सीमावर्ती भागात असलेल्या जेवळी (ता.लोहारा) येथे समतेचे पुजारी व वीरशैव सामाजाचे श्रद्धास्थान महात्मा बसवेश्वरांच पुरातन मंदिर आहे. येथे परंपरेने महात्मा बसवेश्वरांची जयंती ही अक्षयतृतीयापासून तीन दिवस यात्रेच्या स्वरुपात साजरी केली जाते. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी (ता.१) सकाळी नऊ वाजाता बसवेश्वरांची पालखी व मानाच्या नंदीध्वजांची मिरवणूक गावातील प्रमुख मार्गावरून मंदिरापर्यंत काढण्यात आली. या मिरवणूकीत विविध कलापथक व वाद्यपथकासह परीसरातील भाविक मोठ्या संख्यानी सहभागी होते. या प्रसंगी गावातील बहुतांशी घरासमोर सडा- रांगोळी करण्यात आले होती. या पालखी मिरवणुकीचे गावकऱ्यांनी ठीकठीकणी पारंपरिक पध्दतीने स्वागत केले. ही मिरवणूक मंदिर परिसरात पोंचल्या नंतर दुपारी एकच्या सुमारास मंदिरसमोरील मैदानाततील अग्नीकट्यावर हृदयाचे ठोके चुकविनारा अग्निस्पर्श कार्यक्रम पार पडला. यावेळी विविध ठिकाणाहून आलेले पुरंत- स्वामी, हजारो भाविक भक्त पेटत्या निखाऱ्यावरुन पायी चालत जात मनात निर्माण झालेले शड्डविकार जाळुन टाकले. येथे चार मानाच्या नंदीध्वज असून यावेळी अमोल वेलदोडे, मनोज ढोबळे, व्यंकट चवले व ओमकार भुसाप्पा यांनी या नंदीध्वज घेऊन तर ज्ञानेश्वर दूधभाते व महेश भोरे यांनी पालखी घेऊन अग्नि स्पर्श केला. याप्रसंगी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यानंतर प्रथेप्रमाणे भाविकांनी गुळ- खोबऱ्याचा प्रसाद वाटप केला. दुपारी दोन वाजता कोकणातील कलाकारांकडून विविध कला गुण व नाटिका सादर करण्यात आली.
दरम्यान बुधवारी (ता.३०) रात्री अकरा वाजेच्या सुमारास मंदिरा समोरील होम कट्ट्यावर परंपरेनुसार प्रतिकात्मक महात्मा बसवेश्वरांच्या विधीवत विवाह पार पडला. या अक्षदा सोहळ्यास परिसरातील भावी भक्तांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी श्री गुरु सिद्धेश्वर विरक्त मठाचे मठाधिश मनिप्र गंगाधर महास्वामीजींच्या हस्ते अग्नी प्रज्वलान करण्यात आले.
या यात्रा काळात परिसरातून येणाऱ्या यात्रेकरुंना शिवकृपा परिवार, ॲड अतुल हुलसुरे, जगदीश डिग्गे, सत्तेश्वर ढोबळे आदीकडून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले आहे. उन्हाचा कडाका लक्षात घेता येथील ग्रामपंचायत, विविध सामाजिक संस्था, यात्रा कमिटी व नागरिकाकडून ठिक ठिकाणी पाण्याची सोय व सावलीसाठी मंडपाची उभारणी करण्यात आली आहे. आपत्कालीन दक्षता म्हणून आरोग्य विभागाकडून रुग्णवाहिका व लोहारा नगरपंचायतीकडून अग्निशामक वाहनाची उपलब्धता करून दिली आहे
महात्मा बसवेश्वर देवस्थान संस्थेच्या वतीने येथील सामाजिक कार्यकर्ता ज्ञानेश्वर कारभारी यांच्या पुढाकाराने महात्मा बसवेश्वरांच्या जयंती निमित्त बुधवारी (दि.३०) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ६५ बसव प्रेमी नागरिकांनी रक्तदान असून यावेळी सोलापूर येथील सिद्धेश्वर रक्तपेढीने हे रक्त संकलन केले आहे.