
लोहारा/प्रतिनिधी
धाराशिव जिल्ह्यात पाण्याची कमतरता असली, तरी कमी पाण्यात येणाऱ्या पिकांवर प्रक्रिया उद्योग उभारण्याची मोठी संधी आहे. या माध्यमातून उद्योग आणि उद्योजक यशस्वी होऊ शकतात. त्यामुळे औद्योगिक विकासाची सुरुवात धाराशिव जिल्ह्यातून करावी, असे आवाहन रुरल चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष अतुल घुईखेडकर यांनी केले. शहरातील सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या सभागृहात आयोजित औद्योगिक चर्चासत्रात ते बोलत होते. या चर्चासत्रात नगराध्यक्ष नानासाहेब पाटील, एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे, प्राचार्य डॉ.रमेश दापके, उद्योजक राजशेखर पाटील, प्रज्ञात द्विवेदी, उत्तमराव शिंदे, एस.के.जारवाल, चेतन पवार, उदयसिंह दळवी आणि शिवाजी देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. घुईखेडकर म्हणाले, “देशात ६२ टक्के युवा वर्ग आहे, पण १८ ते ४० वयोगटातील तरुणांना काम नाही. ग्रामीण भागातील लोकांचे उत्पन्न कमी असल्याने भारताची अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे. तरुणांची मानसिकता चुकीच्या पद्धतीने तयार केली गेली आहे. ग्रामीण भागात कौशल्य आधारित काम करणारे लोक आहेत, पण त्यांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे.” “प्रगती करायची असेल, तर सूक्ष्म नियोजन करून उद्योग सुरू करा. तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. शेतकऱ्यांनी लहान-मोठ्या कंपन्या स्थापन करून हळद, धणे पावडर, मसाले, लोणचे, डाळी आदी उत्पादने तयार करावीत. रुरल चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडिया त्यांच्या विक्रीची जबाबदारी घेईल,” असे आश्वासन त्यांनी दिले. जीवनराव गोरे म्हणाले, “धाराशिव जिल्ह्याचे हवामान चांगले आहे. बुद्धिमत्तेत हा जिल्हा महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर आहे. येथे कृषीपूरक व्यवसाय करायचा असेल, तर कमी पाणी लागणाऱ्या पिकांची लागवड करावी. कमी पाण्यात बांबूची शेती चांगली होते. बांबूपासून अनेक उत्पादने तयार होतात. त्यामुळे हा उद्योग जिल्ह्याला वाचवू शकतो. पुणे आणि बेंगळुरूच्या धर्तीवर या जिल्ह्यात कृत्रिम बुद्धिमत्ता उद्योगाला मोठी संधी आहे. हा जिल्हा या उद्योगाचे केंद्र बनू शकतो. “या चर्चासत्रात नानासाहेब पाटील, माजी प्राचार्य डॉ.दापके, राजशेखर पाटील आणि इतर मान्यवरांनीही आपले विचार मांडले. प्रास्ताविक डॉ.दिग्गज दापके-देशमुख यांनी केले, चर्चासत्राचे सूत्रसंचालन प्रा.सोमनाथ लांडगे यांनी केले तर फेरोज पल्ला यांनी उपस्थितांचे आभार मानले.