
लोहारा/प्रतिनिधी
बँको ब्लू रिबन पुरस्कार हा बँकिंग क्षेत्रातील उत्कृष्टता, कार्यक्षमता आणि विश्वासार्हतेचा गौरव म्हणून ओळखला जातो. या प्रतिष्ठित पुरस्काराने यंदाही बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संस्था व व्यक्तींचा सन्मान केला. सहकारी संस्थांसाठी लोणावळ्यात दोन दिवसीय ‘अॅडव्हान्टेज सहकार परिषद’ पार पडली. या परिषदेत सहकार क्षेत्रातील महत्त्वाचे विषय चर्चिले गेले, तसेच विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. राज्यभरातील नामवंत सहकारी संस्थांचे प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित होते. याच पार्श्वभूमीवर बँको ब्लू रिबन पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. यावर्षी श्री सिद्धिविनायक मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी ला ‘सर्वोत्कृष्ट संस्थेचा’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. ग्राहकांना उत्कृष्ट बँकिंग सेवा पुरवण्यासाठी संस्था कटिबद्ध आहे, आणि तिच्या या समर्पित कार्याची दखल घेत या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. हा सन्मान मिळाल्याने संस्थेची जबाबदारी आणखी वाढली असून, भविष्यात अधिक नवनवीन उपक्रम राबवण्यास नवसंजीवनी मिळाली आहे. पुरस्कार वितरण समारंभात माजी सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार जाधव यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी अरविंद गोरे, रामचंद्र सारडे आणि देविदास कुलकर्णी उपस्थित होते. यावेळी संस्थेचे संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी संस्थेच्या ठेवीदार आणि सभासदांनी सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले. हा पुरस्कार बँकिंग आणि सहकार क्षेत्रात नव्या संधी निर्माण करण्यास, तसेच कार्यक्षमतेत वाढ करण्यास निश्चितच प्रेरणा देईल.