निजामकालीन शाळेला स्वातंत्र्य काळात वैभवप्राप्त मिळवून देणारे मुख्याध्यापक सेवानिवृत्त
Post-गणेश खबोले

मुरुम (प्रतिनिधी) : भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी स्थापन झालेल्या जिल्हा परिषद मुलांची प्रशालेत अनेक मुख्याध्यापकांनी चांगला कार्यकाळ बजावला. प्रत्येकांने आपल्या कार्यकाळात शाळेची गुणवत्ता वाढविण्याचा प्रयत्न केला. स्पर्धेच्या काळात बदलत्या शैक्षणिक धोरणामुळे शिक्षणाचा दर्जा आणि जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना दिले जाणारे गुणवत्तापूर्ण शिक्षण यामुळे या परिसरातील अनेक पालक आपल्या पाल्यांना जिल्हा परिषद प्रशालेत शिक्षणासाठी पाठवित असल्याचे प्रतिपादन मुख्याध्यापक विजयकुमार देशमाने यांनी केले. रत्नमाला मंगल कार्यालयात गुरुवारी (ता. १) रोजी जिल्हा परिषद प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापक मधुकर ममाळे यांच्या सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक विजयकुमार देशमाने होते. यावेळी प्रमुख अतिथी उमरगा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार, लोहारा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सुभाष चव्हाण, उमरगा विस्तार अधिकारी काकासाहेब साळुंके, अँड. प्रविण तोतला, भाजपा उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत मिणीयार, सोलापूरचे माजी पोलीस उपअधीक्षक कमलाकर पाटील, सांगोलाचे उद्योजक सुभाष दिघे, रोटरीचे माजी अध्यक्ष डॉ. विजयानंद बिराजदार, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चांदपशा गवंडी, उपाध्यक्ष राचप्पा दुर्गे, शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष विलास कंटेकुरे, रोटरी क्लब मुरुम सिटीचे अध्यक्ष कमलाकर मोटे, माजी नगरसेवक अजित चौधरी आदींचे प्रमुख उपस्थिती होती. सत्काराला उत्तर देताना मंमाळे म्हणाले की, गेल्या ३३ वर्षाच्या काळात विविध शाळेत काम करण्याची मला संधी मिळाली. प्रत्येक ठिकाणी गुणवंत विद्यार्थी तयार करण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न केला. या प्रशालेत शिक्षक व पालकांच्या सहकाऱ्यांनेच पटसंख्या व गुणवत्ता वाढविता आली. भविष्यात विद्यार्थ्यांची गुणवत्ता असेल तरच ते कुटुंबाचे आधार होऊ शकतात म्हणून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी भविष्यातही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी धनराज फुरडे, शिवकुमार बिराजदार, सुभाष चव्हाण, प्रविण तोतला, श्रीकांत मिणीयार, कमलाकर मोटे, आश्विनी ममाळे, डॉ. अमरदीप ममाळे, राचप्पा दुर्गे आदींनी मनोगते व्यक्त केली. संतोष कडगंचे, हरिभाऊ माकने, सुभाष व्हटकर, उमाकांत तांदळे, मोहन राठोड, राजू पवार, बाळासाहेब कांबळे, संगीता घुले, संगीता माने, अनिशा फुगटे, निर्मला परीट आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रविण ठाकूर तर आभार शिवाजी कावळे यांनी मानले.