ग्रामीण अर्थ व्यवस्थेला चालना, स्थिरता देण्यामध्ये व महिलांना आत्मनिर्भर बनविण्यामध्ये बचत गटांचे मोलाचे योगदान -गणेश चादरे

ग्रामीण अर्थ व्यवस्थेला चालना, स्थिरता देण्यामध्ये व महिलांना आत्मनिर्भर बनविण्यामध्ये बचत गटांचे मोलाचे योगदान -गणेश चादरे
तुळजापूर /न्यूज सिक्सर
G20 अंतर्गत टाटा सामाजिक विज्ञान संस्था, तुळजापूर व युनायटेड वे ऑफ इंडिया जलसंजीवनी 2.0 च्या संयुक्त विद्यमाने *आर्थिक साक्षरता* *महिला फेडरेशन दस्तऐवजीकरण आणि महिला नेतृत्व कौशल्य* या विषयावर एक दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे उदघाटन प्रो. रमेश जारे, उप संचालक टीस तुळजापूर, व प्रमुख पाहुण्या सहाय्यक जिल्हाधिकारी प्रियमवदा म्हादळकर, प्रमुख व्याख्याते श्री.गणेश चादरे, श्री.भीमाशंकर ढाले,टीम लीडर, श्री. तांबोळी, डॉ. श्रीधर सामंत श्री शंकर ठाकरे, आनंद भालेराव, साखी पोकरे व महासंघातील महिला यांच्या हस्ते करण्यात आले. उदघाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना रमेश जारे म्हणाले की, शाश्वत विकासाचे उद्देश सफल करण्यामध्ये टाटा सामाजिक विज्ञान संस्था व युनायटेड वे ऑफ इंडिया जलसंजीवनी 2.0 चे कार्य महत्वपुर्ण आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना श्री. भीमाशंकर ढाले यांनी जलसंजीवनी 2.0 अंतर्गत करण्यात आलेल्या जलसंधारण, सेंद्रीय शेती व उपजिविका कार्यक्रमाची माहिती दिली. या प्रसंगी, प्रमुख पाहुण्या सहाय्यक जिल्हाधिकारी प्रियमवदा म्हादळकर म्हणाल्या की, स्पर्धेच्या युगामध्ये ग्रामीण भागातील मुलींना मोठ्या प्रमाणात शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची गरज असून मुलींमध्ये उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढले तर बाल विवाहाला त्यातुन आळा बसेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते श्री गणेश चादरे यांनी आर्थिक साक्षरता, महिला फेडरेशन दस्तऐवजीकरण आणि नेतृत्व कौशल्य या विषयावर मार्गदर्शन केले. या प्रसंगी ते म्हणाले की, *G20 चे उद्देश साध्य करण्यामध्ये ग्रामीण अर्थ व्यवस्थेला चालना, स्थिरता देण्यामध्ये व महिलांना आत्मनिर्भर बनविण्यामध्ये बचत गटांचे मोलाचे योगदान आहे* . महिलांना आर्थिक दृष्ट्या साक्षर व सक्षम बनवण्याच्या अनुषंगाने जलसंजीवनीच्या माध्यमातून देण्यात येणारी संसाधने, खेळते भाग भांडवल हे मोलाचे योगदान देत आहेत. गणेश चादरे पुढे बोलताना म्हणाले की, बचत गटामुळे महिलांमध्ये एकता व सहभावना निर्माण झाली आहे. बचत गटामुळे महिला या कर्ज घेण्याच्या नाही तर देण्याच्या भुमिकेत काम करत आहेत. बचत गटामुळे अनेक महिलांनी आपले नेतृत्व सिद्ध करून स्थानिक स्वराज संस्थामध्ये विविध पदावर आपले स्थान बळकट केले आहे. येणाऱ्या काळामध्ये महिलांनी एकत्र येवून दारूबंदी, हुंडाबंदी, स्त्रीभ्रूण हत्या, बालविवाह, शिक्षण व पर्यावरण संरक्षण या महत्वपुर्ण विषयांमध्ये पुढाकार घेण्याची गरज आहे. त्याच बरोबर
महिलांनी राजकीय क्षेत्रात स्वयंनिर्णयाचा अधिकार मिळवण्याची ही गरज आहे. त्यासाठी महिलांना मोठ्या प्रमाणात सर्वच क्षेत्रात संधी देण्याची गरज असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. तांबोळी यांनी मानले.