उस्मानाबाद न्यायालयाने बलात्का-याला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली

उस्मानाबाद न्यायालयाने बलात्का-याला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
चार अल्पवयीन मुली व इतर तीन महिला अशा सात जणींवर लैंगिक अत्याचार करणा-या नराधम आरोपीस गुरूवारी दि. ८ मे रोजी आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. हा निकाल प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजु शेंडे यांनी दिला.
तुळजापूर तालुक्यातील एका गावात सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना ३० ऑगस्ट २०२२ रोजी घडली होती. ग्रामस्थांनी त्यावेळी एका आरोपीला अटक करुन पोलिसांच्या ताब्यात दिले होते. आरोपीने बलात्कार करतानाचे त्याचे मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रीकरण केले होते. एक लहान मुलगी घराच्या पाठीमागे शौचास गेली असता तिला शेजारील शेतात नेहून अत्याचार केला. मुलीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून काही महिला शेतात गेल्यावर आरोपी दुषकृत्य करताना दिसला. आरोपी नग्न होता. त्याला तसेच पकडून चोप दिला. अंकुश वडणे असे या आरोपीचे नाव आहे. तुळजापूर पोलिसात पोस्को कायद्याने गुन्हा नोंद करण्यात आला होता.
अंकुश वडणे याने आजपर्यंत चार अल्पवयीन मुली व इतर तीन महिला अशा एकूण सात जणींवर लैंगिक अत्याचाराचे गुन्हे केले आहेत तर त्याला दोन वेळेस कोर्टाने यापूर्र्वी शिक्षा सुनावली आहे. शिक्षा भोगून आला की तो पुन्हा लहान मुलीवर बलात्कार करायचा. यापूर्र्वी त्याने ४, ८, १०, व ६ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला आहे. शिक्षा सुनावल्यावर त्याच्या चेह-यावर कोणताही पश्चाताप व दु:ख नव्हते तर शिक्षा सुनावल्यावर त्याच्या आईला कोर्टात रडू कोसळले. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्र्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी सई भोरे पाटील व धाराशिव पोलिसांनी 2 महिन्यात केलेला तपास यात महत्वपूर्ण ठरला. यात २२ साक्षीदार तपासण्यात आले. आरोपीने शांत डोक्याने, पुर्वनियोजित क्रूरतेने हे कृत्य केल्याचा युक्तीवाद करण्यात येत फाशीची मागणी केली मात्र न्यायालयाने आजन्म कारावासाची (जन्मठेप) शिक्षा ठोठावली.