ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर येडशी येथील रास्ता रोको आंदोलन स्थगित

ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर येडशी येथील रास्ता रोको आंदोलन स्थगित
उस्मानाबाद /न्यूज सिक्सर
धाराशिव तालुक्यातील येडशी येथील समाज मंदिराचे जुने बांधकाम पाडून नव्याने बांधकाम करण्यासाठी सुनील श्रीकृष्ण शेळके यांनी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देताच खडबडून जागे झालेल्या ग्रामपंचायत प्रशासनाने दखल घेऊन नव्याने प्रस्ताव पाठवून मंजुरी मिळताच नवीन समाजमंदिर बांधकाम करण्याचे आश्वासन ग्रामविकास अधिकारी एस.ए. आडे यांनी दिले. त्यामुळे सोमवार (दि.8) रोजी होणारे रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती आंदोलनकर्ते श्री. शेळके यांनी दिली.
धाराशिव तालुक्यातील येडशी येथील भीम नगर येथे असलेल्या समाज मंदिराची भयंकर दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या जागेवर असलेल्या जुन्या समाज मंदिराची इमारत पाडून त्या ठिकाणी नवीन इमारत बांधकाम करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुनील शेळके यांनी केली होती. मागणीची दखल न घेतल्यास 8 मे रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही शेळके यांनी दिला होता.
दरम्यान आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामविकास अधिकारी श्री. आडे यांनी तत्काळ आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन मागणीची दाखल घेतली. शाखा अभियंता यांनी जागेची पाहणी केली असून त्यानंतर सविस्तर अहवाल पुढील मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रस्तावास मंजुरी मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही अनुसरण्यात येईल असे लेखी आश्वासन ग्रामविकास अधिकारी श्री. आडे यांनी दिले. त्यानंतर रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले.