
अलिबाग:-अमूलकुमार जैन
अलिबाग तालुक्यातील सारळ येथे दोन बोटींना अचानक आग लागून झालेल्या दुर्घटनेने दोन्ही बोटी भस्मसात झाल्या आहेत. या मच्छीमारांचे 20 ते 25 लाखांचे नुकसान झाले आहे. नितीन पाटील यांच्या मालकीच्या या बोटी आहेत. एक बोट जुनी असून दुसऱ्या नवीन बोटीचे काम सुरू होते. सोमवारी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास अचानक बोटीला आग लागली. बघता बघता आगीने चांगलाच भडका घेतला. त्यामुळे बाजूची दुसरी बोट देखील जळण्यास सुरुवात झाली. सदर घटनेचे वृत्त कळताच आर सी एफ कंपनीच्या अग्निशमन दलाला मांडवा पोलिसांनी पाचारण केले. तातडीने घटनास्थळी हजर झालेल्या आरसीएफ च्या अग्निशमन दलाने अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत सुमारे 20 ते 25 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.