न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

महात्मा बसवण्णा – जीवन, विचार आणि कार्य -शितल चव्हाण

Post-गणेश खबोले

 

प्रस्तावना

कार्ल मार्क्सने धर्माम्हंटले. त्यापुढे मार्क्स धर्माचा उल्लेख ‘धर्म म्हणजे हृदयशून्य जगाचे हृदय, आत्मशून्य जगाचा आत्मा’ असा करतो. धर्म आभासी सुखाचे, मृत्यूनंतरच्या सुखाचे आश्वासन देत असल्याने तो पिडितांच्या पिडेचा उसासा असला तरी त्याच्या गुंगीत माणसे वास्तविक जीवनात, वास्तविक सुख निर्माण करण्यापासून दूर राहतात असे तो सांगतो. या अर्थाने मार्क्सच्या दृष्टीने धर्म हा समाज बदलाच्या, परिवर्तनाच्या विरोधी ठरतो. पाश्चिमात्य जगातील अनेक विद्वानांनी धर्माला समाज परिवर्तनातील अडसर समजून नकारात्मक दृष्टीने बघितले. भारतात मात्र जनमानसातील धर्मश्रद्धांना सदाचाराचे, विवेकवादाचे, समतावादाचे आणि विज्ञानवादाचे वळण देत समाजात आमूलाग्र बदल घडवून आणणारे अनेक महामानव होवून गेले. बुद्ध, महावीर, नानक, कबीर, महाराष्ट्रातील संत अशी अनेक नावे घेता येतील. १२ व्या शतकात ‘लिंगायत’ धर्माच्या माध्यमातून महात्मा बसवण्णांनी केलेली क्रांती अशीच अभूतपूर्व आहे. या लेखात आपण महात्मा बसवण्णांचे जीवन, कार्य अन् विचार समजून घेणार आहोत.

पार्श्वभूमी

महामानव, लेखक, कवी, विचारवंत यांची निर्मिती कोण करतो? उत्तर आहे ‘समाज’. महामानवाच्या मनावर, बुद्धीवर ते ज्या समाजात वाढतात तो समाज, त्या समजातील घटना अन् संघर्ष आघात करतात. समाज एकजिनसी कधीही नसतो. त्यात अंतर्विरोध असतात. या अंतर्विरोधातून समाज एका अवस्थेतून दुसरीत जात असतो. ही अंतर्विरोधाची अन् बदलाची प्रक्रिया महामानवाला घडवत असते. म्हणूनच महामानव समजून घेत असताना ते ज्या समाजात वाढले त्या समाजाची पार्श्वभूमी तपासली पाहिजे.
महात्मा बसवण्णांचा जन्म सन ११०५ साली आत्ताच्या कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यात ब्राह्मण कुटुंबात झाला. ते नेमके ब्राह्मण कुटुंबातच जन्मले असावेल याबाबतही इतिहासाच्या अभ्यासकांत मतभेद आहेत. पण इथे आपल्याला त्यांच्या कार्याचा आढावा घ्यावयाचा असल्याने त्या तपशीलात जाणे टाळत आहे. त्यांचे वडील मणिराज हे तेथील आगाराचे भांडारप्रमुख होते. ज्या काळात बसवण्णांची जडणघडण होत होती तो काळ वर्ण-जाती व्यवस्थेचा अन् राजेशाहीचा काळ होता. सर्वसामान्य जनतेत जातीवरुन भेद केले जात. शुद्र जातीतल्या लोकांची अवहेलना केली जाई. अंधश्रद्धा, कर्मकांड, पुरोहितशाही याने आधीच शोषित व अज्ञानी असलेली जनता कमालीची भरडली जात होती. जगण्यात निराशा आल्याने लोकांमध्ये उमेद उरली नव्हती. राजेशाहीतील राजे विलासात रमणारे असतील तर प्रशासन ढिले होवून लोकांना कुणी वाली उरत नव्हता. अशा सगळ्या परिस्थितीत बाल बसव, ज्यांना पुढे प्रेमाने बसवण्णा अन् आदराने बसवेश्वर म्हणून ओळखले जावू लागले, ते वाढत होते.
वयाच्या आठव्या वर्षी बाल बसवने मुंज करुन घेण्यास नकार दिला असा इतिहासात उल्लेख आढळतो. मुंजीचा विधी करुन घेण्यास दिलेला नकार अचानक आलेला नाही. या विधीद्वारे आपण खऱ्या अर्थाने ‘ब्राह्मण’ म्हणजेच सवर्ण होणार अन् एका अर्थाने वर्ण-जाती प्रथा स्विकारणार याचे आकलन बसव यास झाले असावे. आपल्या आसपासच्या घटनांचा अर्थ लावण्याची कुवत साधारणत: या वयात नसते. पण समाजाचे निरिक्षण करणारे, शंका उपस्थित करणारे अन् शंकेचे समाधानकारक उत्तर न मिळाल्यास बंड करणारे व्यक्तीच समाज बदलाच्या प्रक्रियेतील नेतृत्व म्हणून पुढे येतात. बाल बसवने ते धाडस दाखवले अन् बंड केले. बाल बसव मध्ये दडलेल्या महात्मा बसवण्णाने त्याचे प्रस्थापित व्यवस्थेला धक्का देण्याचे पहिले काम केले. पुढे अनेक वर्ष ते कृष्णा आणि मल्लप्रभा या संगमाच्या ठिकाणी म्हणजेच कुडलसंगम येथे राहून ज्ञानार्जन करु लागले असेही उल्लेख आहेत. बसव ते महात्मा बसवण्णा हा प्रवास, बसवण्णांनी लिंगायत तत्वज्ञान जन्मास घालण्याची प्रक्रिया इत्यादी अंतर्ज्ञानातून घडलेले नसते. त्यासाठी या प्रवासात समाजाची निरिक्षणे, अनुभव, अभ्यास लागतो. तो अभ्यास अनेक वर्षे बसवने केला. अन् मग पुढे बसवचे बसवण्णा आणि मग महात्मा बसवण्णा होण्याची प्रक्रिया सुरु झाली.

अनुभव मंटपाची सुरुवात, शरण चळवळ व शरण साहित्य

कुठल्याही बदलाची सुरुवात विचार बदलण्यापासून होत असते. विचार बदलण्यासाठी समाजाच्या सर्व स्तरातील लोकांनी एकत्र येवून चिंतन, मंथन करण्याची आवश्यकता असते. हे ओळखून बसवण्णांनी अनुभव मंटपाची स्थापना केली. अनुभव मंटपाच्या माध्यमातून जीवनाचा विचार करणारी लोकशाही संसद स्थापन्याची जगाच्या इतिहासातील महत्वाची घटना भारतात बसवण्णांनी घडवून आणली. अनुभव मंटपात सर्व जातीतील स्त्री-पुरुष एकत्र येवून जीवनावर विचार करीत. अनुभव मंटपामुळे समाजात सजगता आली, जगण्यावरचा, माणसा-माणसांवरचा विश्वास दृढ झाला. लोक विचार करु लागले, व्यक्त होवू लागले. लोकांचा आशावाद उंचावला, वैचारिक पातळी उंचावली. लोकांच्या निर्णयक्षमतेत, सृजनक्षमतेत, कार्यक्षमतेत सकारात्मक बदल झाले. सगळ्यांचा परिणाम म्हणून लोक उद्यमशील झाले. कार्यकुशलता वाढल्याने उत्पन्न वाढले, क्रयशक्ती वाढली आणि समाजाच्या आर्थिक विकासालाही गती मिळाली.
अनुभव मंटपात समानतेचा, विवेकवादाचा विचार घेवून सामील झालेले पुरुष ‘शरण’ म्हणून तर स्त्रिया ‘शरणी’ म्हणून ओळखल्या जावू लागल्या. विचार संस्कृतऐवजी लोकभाषा कन्नडमध्ये मांडले जावू लागले. ते समाजाला समजण्यास सोपे झाले. गद्यरुपात, मुक्तछांदात पण लयबद्ध पद्धतीने शरण, शरणींनी मांडलेले जीवनविषयक विचार ‘शरण साहित्य’ म्हणून ओळखले जावू लागले. मानवतावादी विचार समाजात रुजवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी शरण साहित्य महत्वाचे ठरले.
खुद्द बसवण्णा आपल्या एका वचनात म्हणतात ‘हा कोणाचा, हा कोणाचा असे म्हणू नये हा आपला, हा आपला असे म्हणावे’. सर्व प्रकारचे भेद गाडून आपलेपणा निर्माण करणारा विचार शरण साहित्याने बिंबवला. वेदप्रामाण्य, कर्मकांड, अंधश्रद्धा यावर शरण साहित्याने आसूड ओढले आणि जगण्याची नवी पद्धत निर्माण केली. यातून निर्माण झालेली चळवळ ‘शरण चळवळ’ म्हणून ओळखली जाते.

लिंगायत धर्माची स्थापना आणि लिंगायत तत्वज्ञान

धर्म हा कष्टणाऱ्या, राबणाऱ्या माणसाचा आधार असतो. जीव की प्राण असतो. त्याच्या जगण्याचा अत्यंत नाजूक भाग असतो. या लोकांतील धर्मश्रद्धेला सकारात्मक, समतावादी वळण देण्यासाठी बसवण्णांनी एकच ईश्वर आहे, तो निर्गुण, निराकार असून कष्ट करण्याने, सदाचरणाने त्याची प्राप्ती होते असा संदेश देणाऱ्या लिंगायत धर्माची स्थापना केली.
माणूस आणि देव यांच्यामध्ये दलाली करुन लोकांची लूट करणाऱ्या पुरोहितशाहीला संपवण्यासाठी बसवण्णांनी लोकांचा देव लोकांच्याच गळ्यात ‘लिंगाच्या’ रुपाने बांधला. मंदिरातला देव धडाभोवती, धाग्यात लिंगरुपाने बांधल्याने देवाची पुजा करायला कुण्या मध्यस्थाची गरज उरली नाही. कर्मकांडही नाहीसे झाले. आपला देव, आपल्या जवळच ठेवून आपणच त्याची पुजा करायची अशी सोपी पद्धत आल्याने धार्मिक अवडंबर थांबले. ‘देवालयाकडून देहालयाकडे’ हा संदेश समाजात पसरला. लिंग धारण करणारा तो ‘लिंगायत’ अशी सोपी व्याख्या करुन माणसामाणसातले भेद मिटवले गेले. अनावश्यक धार्मिक विधींवर होणारा खर्च अन् जाणारा वेळ टळला. तो पैसा उपयुक्त कारणांसाठी आणि वेळ उपयुक्त कामांसाठी खर्च करणे शक्य झाले.
लिंगायत धर्माद्वारे बसवेश्वरांनी समानता, बंधुभाव सांगितला, प्राणिमात्रांप्रती दयाभाव सांगितला, श्रमाची प्रतिष्ठा केली, आंतरजातीय विवाह लावले, समाजासाठी काही देण्याची वृत्ती रुजवली. गुंड, चोर, दारु विकणारे, वैश्या यांचे मतपरिवर्तन करुन त्यांना चांगल्या मार्गाला लावले. काश्मीरहून आलेला चिक्कय्या या हत्याऱ्याने बसवण्णांचे कार्य अन् विचार पाहून हत्या करण्याचे काम बंद केले व तो व्यवसाय करु लागला. अशारितीने समाजात सर्वत्र सकारात्मकतेचा प्रसार झाला.

कायक वे कैलास

वेद, पुराणांची पोपटपंची करणारे श्रेष्ठ अन् काबाडकष्ट करुन समाजाला जगवणारे तुच्छ समजले जात असतानाच्या काळात बसवण्णांनी ‘कायक वे कैलास’ म्हणजे ‘श्रम हेच स्वर्ग आहे’ असा मुलमंत्र सांगत श्रमाची प्रतिष्ठा तर केलीच पण श्रम करणाऱ्यांना समाजात मानाचे स्थान मिळवून दिले. ऐतखाऊ लोकांना त्यांची जागा दाखवून दिली. श्रमाला महत्व आल्याने उत्पादन वाढून आर्थिक स्थैर्य आले.

दासोह

‘दासोह’ हा शब्द दान या अर्थाने काही लोक घेतात. पण दान या शब्दामागे ते करणाऱ्याच्या श्रेष्ठत्वाचा आणि स्विकारणाऱ्याच्या कनिष्ठतेचा भाव येतो. ‘दासोह’ मध्ये देणाऱ्याचा जबाबदारी आणि घेणाऱ्याचा ‘प्रसादी’ हा भाव अभिप्रेत आहे. आपल्या उत्पन्नाचा काही भाग आपले कर्तव्य म्हणून समाजासाठी खर्च करण्याचा भाव यात आहे. यात अनेकवेळा शरण-शरणी एकमेकांना जेवणासाठी आमंत्रित करायचे. यातून एकमेकांबद्दलची आपुलकी वाढायची शिवाय जाती-पातीमुळे आलेला दुरावा कमी व्हायचा. बसवण्णांनी दलित व मागास समजल्या गेलेल्या जातीतील लोकांच्या घरी भोजन घेतले, त्यांना आपल्या घरी जेवण घातले. आजही लिंगायत धर्मीय ‘दासोह’ पाळतात.

आंतरजातीय विवाह

दलित समजल्या जाणाऱ्या जातीतील हरळय्या यांचा मुलगा शीलवंत आणि मधुरस या ब्राह्मणाची कन्या कलावती यांचा विवाह घडवून आणण्यासाठी बसवण्णांनी पुढाकार घेतला. जातीप्रथा खोलवर रुजलेल्या काळात, बाराव्या शतकात बसवण्णांनी आंतरजातीय विवाह घडवून आणला ही मोठी क्रांतिकारी घटना आहे.

उत्तम प्रशासक

बसवण्णांच्या अंगचे गुण लक्षात घेवून त्यांना तत्कालीन बिज्जल राजाच्या राज्यात प्रधानमंत्री म्हणून नेमले गेले. प्रधानमंत्री पदावरुन बसवण्णांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. सुशासन बसवले. सार्वजनिक सोयी, सुविधा पुरविल्या. प्रौढ शिक्षणाची सुरुवात केली. राज्यातील प्रजेचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केले.

संघर्ष, लढे आणि कुडलसंगमी देहाचा अंत

भारतातच नाही तर जगभारत ज्या-ज्या महामानवांनी समाजात पुरोगामी, नवा विचार रुजवायचे प्रयत्न केले त्यांचा सनातन्यांनी छळ केला. बसवण्णा आणि शरण चळवळ याला अपवाद नाहीत. बसवण्णांनी उभ्या केलेल्या चळवळीमुळे सनातन्यांना, पुरोहितशाहीला जबर हादरे बसले. कर्मकांडावर, पौरोहित्य करुन जगणाऱ्या ऐतखावूंचे आर्थिक हितसंबंध दुखावले गेले. ‘माझ्यापेक्षा कुणी लहान नाही, माझ्यासह आपण सर्व समान आहोत’ या बसवण्णांच्या भूमिकेमूळे बसवण्णांसारखे महात्मा पदाला पोचलेले व्यक्ती सगळ्यात मिसळतात, सगळ्यांना समान मानतात तर मग कुठलेही कर्तृत्व नसलेले, केवळ एका ठराविक जातीत जन्माला आल्याने स्वत:ला श्रेष्ठ समजणारे थोर कसे? असा विचार लोक करु लागले. जातीआधारीत समाजातील श्रेष्ठत्वाची धर्माधिष्ठित यंत्रणा लिंगायत चळवळीने कोसळू लागली. त्याने दु:खावलेल्या सनातनी व वर्ण-जातीचे समर्थन करणाऱ्या लोकांनी बसवण्णांची चळवळ संपवण्यासाठी बसवण्णांसह, शरण-शरणींवर हल्ले चढवले. आंतरजातीय विवाह घडवून आणल्याने ‘धर्म बुडाला’ अशी आवई उठवली गेली. राजा बिज्जलाचे कान भरुन त्यांना शरण चळवळीविरुद्ध उभे केले गेले. दरम्यान राजा बिज्जलाची हत्या झाली. या हत्येचे खापर शरणांवर फोडून राज्ययंत्रणेचा वापर शरणांना संपवण्यासाठी केला गेला. अनुभव मंटप जाळून खाक करण्यात आले. वचन साहित्य जाळण्यात आले. तरीही काही शरण-शरणींनी हातात ढाल, तलवार आणि पाठीला वचन साहित्य बांधून ते जपले. या धुमाकुळीतच महात्मा बसवण्णांच्या देहाचा कुडलसंगम येथे अंत झाला. त्यांची सनातन्याकडून हत्या झाली असण्याची दाट शक्यता आहे.

लिंगायत धर्माचे ब्राह्मणीकरण

लिंगायत हा स्वतंत्र धर्म नसून तो हिंदू धर्मातील एक सांप्रदाय आहे असा खोटा प्रचार केला जातो. महात्मा बसवण्णा हे अवतार असल्याचे सांगून त्यांच्या पश्चात त्यांचे दैवतीकरण केले गेले. लिंगायत धर्माच्या प्रतिकांचे ब्राह्मणीकरण करुन या धर्मातही कर्मकांड, अंधश्रद्धा, जातीवाद घुसडला गेला. परंतू, आजही काही लिंगायत आपल्या धर्माचा मुळ विचार प्रमाण मानतात.

समारोप

बसवण्णांचे देह आपल्यातून गेले असले, लिंगायत धर्माचा मूळ मानवतावादी, विज्ञानवादी आणि विवेकवादी विचार क्षीण करण्याचा प्रयत्न झाला असला तरी हा विचार आजवर समतावादी चळवळीसाठी प्रेरणादायी आणि दिशादर्शक ठरला आहे. ज्या शरणांनी आपले शीर तळहातावर घेवून हा विचार टिकवला आहे, तो समजून घेणे, त्याचे जतन करणे, समाजात त्याचा प्रचार-प्रसार करणे नितांत आवश्यक आहे.
आज सर्वच बाबतीत आपली अवस्था भरकटल्यासारखी, दिशाहीन झाल्यासारखी आणि आंधारात चाचपडणाऱ्यासारखी झाली आहे. या अंधकारात बुद्धांचा, बसवण्णांचा अन त्यानंतरच्या सर्व समतावाद्यांचा विचार आपल्याला प्रकाशवाट दाखवणारा आहे. या उजेडाच्या वाटेवरुन चालत, अंधारातील इतरांनाही यात सामील करुन घेण्याचा संकल्प करुया.

© ॲड. शीतल शामराव चव्हाण
(मो. 9921657346)

(दि. १५ फेब्रूवारी, २०२२ रोजी लिहिलेला हा लेख आज महात्मा बसवण्णा जयंतीच्या निमित्ताने पुन्हा शेअर करीत आहे.)

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे