आपली दृष्टी आणि दृष्टिकोन बदला आयुष्य बदलेल !
देविदास पांचाळ सर सैनिक स्कूल तुळजापूर जिल्हा धाराशिव

आपली दृष्टी आणि दृष्टिकोन बदला आयुष्य बदलेल !
माणसाने कुठल्याही प्रसंगाने खचून न जाता त्या प्रसंगामागील पार्श्वभूमीचा अभ्यास करावा. मनाची शांतता ठेवावी, विचाराची स्थिरता ठेवावी ,थोडा वेळ थांबावे ती वेळ निघून गेल्यानंतर मग हे असे का झाले ? कशामुळे झाले ? का घडले असावे ?ही घटना आपल्या बाबतीतच का घडते ! याचा चिकित्सकपणे अभ्यास केला तर या प्रसंगाचे या घटनेचे उत्तर आपल्याला सापडेल. एखाद्या गोष्टीकडे आपला बघण्याचा दृष्टिकोन जसा असेल तसे आपल्याला जग दिसते .म्हणतात ना “जशी दृष्टी तशी सृष्टी “एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन नेहमी सकारात्मक असला पाहिजे .सकारात्मक दृष्टी जर असेल तर आपली काम करण्याची शक्ती वाढते. आपण क्रियाशील राहतो .जर आपला दृष्टिकोन नकारात्मक असेल तर शरीरात नकारात्मक ऊर्जा तयार होते !आणि आपण ते काम करण्यास नकार देतो व ते काम आपल्याकडून होत नाही .आपल्याकडे पात्रता असताना, बुद्धी असताना, विचार असताना, शक्ती असताना ,आपण त्या गोष्टीकडे नकारात्मक दृष्टीने पाहतो केवळ नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये आल्यामुळे आपले सर्व विचार संपतात . आपण त्या कार्यामध्ये यश प्राप्त करू शकत नाही .एखाद्या मंदिरामध्ये गेल्यानंतर किंवा मंदिराच्या परिसरामध्ये गेल्या बरोबर आपले मन प्रसन्न होते. सकारात्मक शक्ती जागृत होते. संपूर्ण परिसरामध्ये सकारात्मक शक्तीचा वास असतो .आपल्या मनामध्ये सकारात्मक शक्ती जागृत होऊन आपले काम पूर्ण होते आपला पाहण्याचा दृष्टिकोन बदला म्हणजे आयुष्य बदलेल–
विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास करावा .आपल्या आवडीच्या विषयांमध्ये पुस्तकांमध्ये चिकित्सक पद्धतीने अभ्यास करावा व त्याचा शोध घ्यावा. जिद्दीने सकारात्मक विचार आपल्याजवळ ठेवावा.
सकारात्मक विचार करून पुढील वाटचालीस सुरुवात करावी .शेवटी यश नक्की मिळेलच ! यासाठी आपल्याला शेतकऱ्यांचे उदाहरण घेता येईल शेतकरी 24 तास आपल्या शेतात राब राब राबतो .वर्षभर आपल्या शेतीमध्ये काबाडकष्ट करतो कारण त्याला माहिती आहे त्याचा विश्वास आहे पाऊस हा पडणारच आहे. त्या आशेने तो सकारात्मक विचार करून शेतीची मशागत करतो. शेवटी त्याला यश हे हमखास मिळतेच. त्याची दृष्टीच सकारात्मक असते .सकारात्मक दृष्टी किंवा सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास त्यामध्ये सकारात्मक शक्ती निर्माण होते. व कामे लवकर होतात .आपण ठरवली तशी होतात .सृष्टीचा नियम आहे टिट फॉर tat त्यात जसे आपण दुसऱ्याला द्याल तसेच आपल्याला परत मिळेल . किंवा पेराल तेच उगवेल प्रश्नाला प्रतिप्रश्न आणि उत्तराला प्रत्युत्तर हे मिळणारच असते .आपण समोरच्याला आरे म्हटलं तर तो का रे म्हणेल , आपण आहो म्हटलं तर तो काहो म्हणेल हा सर्व शब्दांचा खेळ आहे. आपण बोलताना चांगली भाषा, चांगली वाणी ,शुद्ध शब्द ,विनयशीलता, प्रेम ,विश्वास यावर आधारित जर बोलत असो तर ते समोरच्यांना लवकर आवडते व आपली भाषा ऐकूनच समोरच्या व्यक्तीची आपल्याकडे बघण्याची दृष्टी बदलते. आणि दृष्टिकोनही बदलतो .तोही आपल्याशी चांगल्या भाषेत संवाद करण्यासाठी तयार होतो. आपल्याला एखाद्या विषयीचे ज्ञान जरी नसले तरी आपल्याकडे आपुलकीचे भाव असतात, क्रोधाला जिंकण्यासाठी प्रेमाचे चार शब्दही आपल्याकडे असतात, परंतु अशा शब्दाचा उपयोग वेळ प्रसंग पाहून केला पाहिजे तर आपण आपल्या कार्यामध्ये व नियोजनामध्ये यशस्वी होऊ. एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या घटनेबद्दल, एखाद्या ठिकाणांबद्दल, एखाद्या कार्याबद्दल ,आपला विशिष्ट दृष्टिकोन झालेला असतो .तो आपल्या मनावर चांगलाच बिंबलेला असतो. त्यामुळे त्याला लवकर बदलणे शक्य होत नाही .म्हणून आपली दृष्टी जशी ठेवाल तसा आपला दृष्टिकोन बदलतो ! लहानपणापासून एखाद्या बालकाच्या मनावर आपण ज्या ज्या गोष्टी बिंबवतो सांगतो तसेच त्याच्या मनावर त्या बिंबतात व त्याची दृष्टी तशी तयार होते .लहान मूल हे आपल्या दृष्टीतून बघत असते. मग जशी आपली दृष्टी असेल तशीच त्याची दृष्टी बनते . एखाद्या व्यक्तीबद्दल त्याच्या कार्याबद्दल त्याच्या चरित्राबद्दल एखाद्या देशाबद्दल त्याची दृष्टी बनते .आपल्या देशाकडे, आपल्या राज्याकडे ,आपल्या जिल्ह्याकडे ,आपल्या गावाकडे, आपल्या कुटुंबाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन जसा असेल, तशी आपल्याला प्रतिक्रिया मिळते. क्रिया तशी प्रतिक्रिया असे म्हणतात ते अगदी बरोबर आहे. या सगळ्यांमध्ये आपली दृष्टी जर प्रेमाची असेल, आपला दृष्टिकोन जर चांगला असेल, तर हे सगळं जग आपलंच आहे ! परंतु आपल्याच दृष्टी आणि दृष्टीकोनामध्ये खोट असेल तर सगळं जग आपल्याला खोटं भासेल ! म्हणतात ना सरळ मार्गाने जाणाऱ्या व्यक्तीचा रस्ता कधीच चुकत नाही. तो इतरांना विचारत विचारत का असेना परंतु आपले ध्येय गाठतो . ध्येयापर्यंत पोहोचतो .त्यासाठी आपला मार्ग योग्य असला पाहिजे त्या मार्गावर चालण्याची आपली दृष्टी सकारात्मक असली पाहिजे व आपला दृष्टिकोन ही सकारात्मक असला पाहिजे .
————————‐————-