ग्रामसभा हाच लोकशाहीचा मुळ पाया-प्रा.रमेश जारे

ग्रामसभा हाच लोकशाहीचा मुळ पाया-प्रा.रमेश जारे
तुळजापूर/न्यूज सिक्सर
टाटा सामाजिक विज्ञान संस्था, तुळजापूर व ग्राम पंचायत, मंगरूळ ता.तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 24 एप्रिल 2023 हा ” राष्ट्रीय पंचायती राज दिवस” म्हणून साजरा करण्यात आला. या प्रसंगी
कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून सहाय्यक गट विकास अधिकारी मोहन राऊत, कार्यक्रम अध्यक्षा म्हणून सरपंच सौ. विजयालक्ष्मी डोंगरे, प्रमुख व्याख्याते प्रो.रमेश जारे, पंचायती राज तज्ञ, उप संचालक टाटा सामाजिक विज्ञान संस्था, तुळजापूर, श्री. गणेश चादरे, ग्रामीण विकास तज्ञ, टीस, तुळजापूर, श्री. गिरीष डोंगरे, उपसरपंच, कृषी अधिकारी नवनाथ अलमले, श्री. पवार, टाटा संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते श्री शंकर ठाकरे, ग्राम पंचायत सदस्य, अंगणवाडी कार्यकर्त्या, आशा कार्यकर्ती, बचत गटातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्यांनी उपस्थित होते.
या प्रसंगी, कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते म्हणून प्रो.रमेश जारे हे
पंचायती राज व्यवस्थेमध्ये 73 व्या घटना दुरुस्तीचे महत्व या विषयावर मार्गदर्शन करताना म्हणाले की, खऱ्या अर्थाने ग्रामसभा हाच लोकशाहीचा मुळ पाया आहे कारण फक्त ग्राम पंचायतीच्या ग्राम सभेतच जनतेला प्रत्यक्ष सहभाग घेवून आपले मत मांडण्याचा व बोलण्याचा अधिकार दिलेला आहे. दुसऱ्या बाजूने आपण तुलनात्मक विचार केला तर असे दिसून येते की, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा या ठिकाणी फक्त लोक प्रतिनिधीनांच आपले मत मांडण्याचा व बोलण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यामुळे ग्रामसभेला अत्यंत महत्व आहे.
पंचायती राज व्यवस्थेमध्ये 73 व्या घटना दुरुस्तीमूळे पंचायती राज संस्थांना घटनात्मक दर्जा मिळाला, जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत ही त्रिस्तरीय पध्दती अंमलात आली, ग्रामसभांची स्थापना बंधनकारक करण्यात आली, पंचायतीची मुदत पाच वर्ष करण्यात आली, महिलांना 33% जागांचे आरक्षण देण्यात आले (सध्या 50% आहे), अनुसूचित जाती-जमातीसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यात आले, वित्त व निवडणूक आयोगाची स्थापना व सत्तेचे विकेंद्रीकरण या दुरुस्तीमुळे महिलांना व मागासवर्गीय यांना मिळालेल्या अधिकारामुळे पंचायती राज व्यवस्थेमध्ये क्रांतिकारी बदल झाले असल्याचे प्रो. रमेश जारे यांनी नमुद केले.
या प्रसंगी, टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे ग्रामीण विकास तज्ञ श्री. गणेश चादरे यांनी ” *ग्राम व देश विकासात लोकंसहभागाचे महत्व”* या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले की, मूलतः देशाला स्वातंत्र्य हे लोकंसहभागातून व अनेक थोर महापुरुषांच्या, समाज सुधारकांच्या व जनसामान्य लोकांच्या त्यागातून व समर्पणातूनच मिळाले आहे. त्यामुळे भारतीय लोकशाहीमध्ये लोकंसहभागाला अन्यन साधारण असे महत्व आहे.
पुर्वी गावगाडा हा पंच कमिटीच्या पंचायतीच्या माध्यमातून चालवला जात असे यामध्ये लोकांच्या व्यक्तिगत समस्या बरोबरच सार्वजनिक समस्या सोडवण्यासाठीची एक लोकसहभागीय परंपरा होती.
पंचायती राज व्यवस्था अस्तिवात आल्यानंतर त्या पंच व्यवस्थेला प्रशासनिक दर्जा प्राप्त झाला. आणि त्याचे रूपांतर ग्राम पंचायत प्रशासनाच्या माध्यमातून होऊ लागले. शासनाच्या अनेक योजना, अभियान, मोहिमा या लोकवाटा व लोकंसहभागावर आधारीत तयार करण्यात आल्या. त्याचा मुख्य उद्देश म्हणजे प्रत्येक योजना व अभियान हे लोकंसहभागावर आधारीत व लोकं नियंत्रित असावे हाच होता. त्याच भावनेतून लोकांनी आजवर आलेल्या अनेक संकटांवर मग तो भूकंप असेल, दुष्काळ असेल कोविड सारखी महामारी असेल यावरती यशस्वीपणे मात केली आहे. त्याच बरोबर लोकांनी स्वच्छता अभियान, हांगणदारी मुक्त गाव, कुपोषण मुक्त गाव, महात्मा गांधी तंटामुक्ती मोहिमी, दारूबंदी, वृक्ष लागवड व जल संवर्धन असे अनेक अभियान व योजना या लोकसहभागातून यशस्वीच केल्या आहेत. त्यामुळे जनतेच्या सहभागाचे फार महत्व आहे. ते कमी होऊ नये ही
काळानुरूप बदल होत गेला आणि लोकं वाट्याची जागा ही एक वाट्याने घेतल्याने लोकांचा सहभाग कमी कमी होत गेला.
*लोकंसहभाग कमी होण्याची कारणे,*
1. लोकांच्या गरजा व मत विचारात न घेता व त्या त्या भागांची भौगोलिक परिस्थिती, उपलब्ध संसाधने यांचा विचार न करता थेट बनवण्यात येणाऱ्या (Top to Bottom Approach) योजना.
2. ग्रामसभांमधील नागरिकांचा विशेष करून तरुण युवकांचा अत्यल्प सहभाग
3. ग्रामसभांमध्ये विकास कामांवर चर्चा व निर्णय होण्याऐवजी मोठ्या प्रमाणात होणारे भांडणतंटे.
4. राजकीय द्वेष भावनेतून चांगल्या विचारांकडे/सूचनांकडे करण्यात येणारे दुर्लक्ष
5. वाढती स्वार्थी व भ्रष्टाचारी वृती
6. महिलांचा अत्यल्प सहभाग
7. महिलांच्या अधिकारावर वाढता पुरुषी हस्तक्षेप
8. लाभार्थी निवडीमधील भेदभाव
9.लोकं प्रतिनिधींकडे पंचायत राज व्यवस्थेबाबत व योजनांबाबत असलेल्या माहितीचा अभाव.
10. ग्रामस्थांच्या समस्या निवारण व मुलभूत सुविधां पुरवण्यामध्ये होणारा विलंब व पाठपुरावा करून ही करण्यात येणारे दुर्लक्ष
या अशा एक ना अनेक कारणांमुळे दिवसेंदिवस गाव विकासाच्या प्रक्रियेमध्ये लोकं सहभाग कमी होत आहे.
शासनाची योजना ही आमची आहे व आमच्यासाठीच आहे व त्यातुन उभ्या राहिलेल्या मालमत्ता या आमच्यासाठीच आहेत. ही भावना जोपर्यंत लोकांमध्ये रुजत नाही व रुजवली जात नाही तो पर्यंत योजना यशस्वी होणार नाहीत व यामध्ये लोकांचा सहभाग वाढणार नाही. यासाठी मोठ्याप्रमाणात जाणीव जागृती करण्याची गरज आहे.
त्याच बरोबर यासाठी व्यापक दृष्टिकोन ठेवणारी माणसं तयार करणे आवश्यक आहे आणि हे घडलं तरच लोकंसहभागावर आधारीत गांव व देशाचा अधिक गतीने विकास घडवण्यास मदत होईल. त्यासाठी भविष्यात ग्रामसभेतील लोकंसहभाग हाच ग्राम व देशाच्या शाश्वत विकासाचा मुळ आधार असेल असा आशावाद गणेश चादरे यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी, उदघाटक मोहन राऊत यांनी मिशन वात्सल्य अंतर्गत अनाथ मुलांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती दिली व ग्रामपंचायतीने केलेल्या कार्याचे कौतुक केले.
शासकीय योजनांची जत्रा या विषयी श्री नवनाथ आलमले यांनी सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना ग्रामविकास अधिकारी श्री लक्ष्मण सुरवसे यांनी ग्राम पंचायतने राबविलेल्या पाणलोट क्षेत्र विकास, स्वच्छता अभियान, पोषण बाग या यशस्वी उपक्रमांची माहिती दिली.
या प्रसंगी आदर्श पोषण बाग उपक्रम यशस्वीपणे राबविल्या बद्द्ल अंगणवाडी कार्यकर्तीचा सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी, कार्यक्रमाच्या अध्यक्षा सरपंच सौ. विजयालक्ष्मी डोंगरे यांनी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने राष्ट्रीय पंचायतीराज दिवस साजरा करण्यासाठी मंगरूळ ग्राम पंचायतची निवड करून ग्रामस्थांना पंचायतीराज व्यवस्थेबद्द्ल व लोकंसहभागा बद्द्ल मार्गदर्शन केल्याबद्द्ल व ग्रामस्थांनी मोठ्या संख्यांनी उपस्थितीती दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.