
तुळजापूर -प्रतिनिधी
श्री तुळजा भवानी मातेच्या क्षेत्र तुळजापूर नगरीत राज्यातून व परराज्यातून भाविक मोठ्या संख्येने देवि दर्शनास येत आहेत.
नवरात्र मध्ये पहिले तीन चार दिवस देविस विशेष सुवर्ण अलंकार नेसविले जात असतात.पाचव्या दिवसा पासून ते नऊव्या दिवसापर्यंत विशेष अवतार अलंकार महापुजा मांडली जात असते. यात रथ अलंकार महापुजा,मुरली अलंकार महापुजा,शेषशाही अलंकार महापुजा, छत्रपती शिवाजी महाराजांना देवि भवानी तलवार देत असलेली अलंकार महापुजा व महिषाशूर मर्दिनी अलंकार महापुजा मांडल्या जात असतात.या सर्व पुजा देविचे मुख्य पुजक भोपे पुजारी मांडत असतो याकामी सेवेदार हमरोजीबुवा भोपे पुजारी यांना सहकार्य करीत असतात. आज सोमवार दि.०७ आक्टोबर २०२४ अश्विन शुध्द ॥४॥ या दिवशी देविचे मुख्य भोपे पुजारी समाधान कदम,सचिन कदम,अतुल मलबा,विनोद सोंजी यांनी देविस रथ अलंकार पुजा मांडली.या रथ अलंकाराचे महत्व म्हणजे भगवान सुर्य नारायणांनी आपला रथ त्रिलोक भ्रमणासाठी श्री तुळजा भवानी मातेस दिला याचे प्रतिक म्हणून ही विशेष रथ अलंकार महापुजा शारदीय नवरात्र व शाकंभरी नवरात्र मध्ये मांडली जात असते अशी माहिती भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम यांनी दिली.