मातंग,चर्मकार,होलार व बहुजनांनी बौद्ध धम्म स्वीकारुन घरवापसी करावी : प्रबुद्ध साठे
Post-गणेश खबोले

लोहारा-प्रतिनिधी
बौद्ध धम्म हेच खरे बहुजन समाजाचे आस्तित्व व ओळख असून पूर्वाश्रमीचे आम्ही सारे बौद्धच होतो. बौद्ध भारत हाच खरा भारताचा चेहरा असून किमान अनुसूचित जातीमध्ये असणारा जातीभेद नष्ट होवून त्यांचा एकच प्रबुद्ध समाज बनावा. यासाठी मातंग, चर्मकार, होलार इत्यादी बहुजनांनी बौद्ध धम्म स्वीकारुन घरवापसी करावी असे, प्रतिपादन भारतीय बौद्ध धम्म संस्कार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष व चला आपल्या बुध्दाच्या घरी अभियानाचे प्रमुख प्रबुद्ध साठे यांनी केले. रविवारी (दि.२५) सकाळी ११:०० वाजता आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
धानुरी (ता .लोहारा)येथे छत्रपती शिवाजी महाराज, माता रमाई आंबेडकर, संत गाडगे महाराज, संत रविदास, संत सेवालाल व कसबे तडवळे येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेल्या महार मातंग वतनदार परिषदेच्या वर्धापनदिन निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी प्रबुद्ध साठे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती कामगार संघटनेचे अध्यक्ष तानाजी गायकवाड होते. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचे तालुकाध्यक्ष तानाजी माटे, फकिरा ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष श्रीरंग सरवदे, धानुरीचे सरपंच प्रवीण थोरात, खेडच्या सरपंच राजश्री कांबळे, बहुजन रयत परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष बालाजी गायकवाड,बसपा जिल्हा अध्यक्ष डॉ. शिवाजी ओमान,बसपाचे जिल्हा प्रभारी महादेव लोखंडे , चर्मकार महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष बळीराम बनसोडे, लहूजी शक्ती सेनेचे मराठवाडा महासचिव दिलीप गायकवाड, नेहरू युवा केंद्र समन्वयक निकिता गायकवाड, फकिरा ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण खंडाळे, बसपा विधानसभा अध्यक्ष सोमनाथ गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना प्रबुद्ध साठे म्हणाले की,समरसता मंच, RSS च्या , प्रस्थापितांच्या दलालांच्या नादी लागून मातंग समाजाने आणखी स्वतः चे वाटोळे करून घेवू नये.मातंग समाजातील आंबेडकरवादी लोकांच्या नेतृत्वाखाली मानवतावादी चळवळीत सामील व्हावे, जात ही अभिमान बाळगणारी बाब नसून, जात अस्मिता हा आत्मघात आहे. जाती अंताचा लढा देणे हा आत्मसन्मान आहे, जातीअंतातून माणूस, समाज, राष्ट्र निर्माण करण्यासाठी बौद्ध धम्माशिवाय पर्याय नाही.
यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे तालुका संघटक युवराज गायकवाड, विष्णू वाघमारे, महानंदा कांबळे, तानाजी शिंदे, नागीन वाघमारे, लिंबाचा गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.