
लोहारा -प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण दि.१ मे रोजी धाराशिव येथील स्वयंवर मंगल कार्यालयात पार पडले.
शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील ११ शिक्षकांचा सन्मान सोहळा पार पडला. यामध्ये लोहारा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलवाडी येथील शिक्षिका सुनंदा मधुकर निर्मळे यांचा ही सन्मान परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाला खा.ओमप्रकाश राजे निंबाळकर,आ.राणा जगजितसिह पाटील,आ. कैलास पाटील,आ.प्रवीण स्वामी यांच्यासह जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष,शिक्षण अधिकारी(प्राथमिक) अशोक पाटील,शिक्षण अधिकारी(माध्यमिक/ योजना) सुधा साळुंके आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत प्राप्त झालेल्या शिफारशीच्या आधारे, प्राथमिक व माध्यमिक अशा दोन्ही स्तरांवर काम करणाऱ्या शिक्षकांची निवड करण्यात आली होती.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलवाडी येथील शिक्षिका सुनंदा मधुकर निर्मळे यांची अध्यापन पद्धती,विद्यार्थ्यांशी असलेली बांधिलकी,उपक्रमशीलता, शाळेतील अभिलेख व्यवस्थापन, नावीन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी, तसेच शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीतील सहभाग आदी निकषांच्या आधारे जिल्ह्यातील ११ पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या यादीत निर्मळे यांची निवड करण्यात आली होती.त्यांच्या निवडी निमित्त त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.