परीक्षा कालावधी मध्ये लोड सेडिंग बंद करा अन्यथा आंदोलन -मनसे विद्यार्थी सेना
Post - गणेश खबोले

लोहारा-प्रतिनिधी
इयत्ता १० वी व १२ वी च्या परीक्षा बुधवारी (दि.२१) पासून सुरू होत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना पहाटेच्या वेळी अभ्यास करताना लोड शेडिंगच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे परीक्षा कालावधीत लोहारा तालुक्यात पहाटेच्या वेळी केले जाणारे लोड शेडिंग त्वरित बंद करुन वीज पुरवठा सुरळीत करावा अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा लोहारा तालुका महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने महावितरणच्या उपकार्यकरी अभियंत्याकडे (दि.२०) निवेदनाद्वारे दिला आहे.
महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, लोहारा तालुक्यात इयत्ता दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू होत असून विद्यार्थ्यांना पहाटे पासुन परीक्षेचा अभ्यास व तयारी करावी लागते, त्यात महावितरण कंपनीकडून पहाटे ५ ते सकाळी ८ वाजेपर्यंत लोड सेडिंग करण्यात येते. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. पहाटे व सकाळचा अभ्यास विद्यार्थ्यांना उत्तम असतो पण तो करण्यासाठी आपल्या इथे पहाटे लाईटच नसते, मग त्या विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करायचा? महावितरणकडून दिवाळी, ईद, ख्रिसमस, उरूस, जत्रा या धार्मिक कार्यक्रमासाठी व सणावारासाठी व इतर कारणांसाठी महावितरण कार्यालयाकडून लोड सेडिंग बंद असते. मग विद्यार्थ्यांच भवितव्य या बोर्डाच्या परीक्षावर अवलंबून असते, विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील हा महत्त्वाचा टप्पा असतो, लोड सेडिंग मुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम व त्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी आपल्या स्तरावरुन तात्काळ संपूर्ण तालुक्यातील लोड सेडिंग बंद करुन सुरळीत वीज पुरवठा करावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे मनसे स्टाईल खळखट्याक आंदोलन करण्यात येईल निवेदनात म्हंटले आहे.
या निवेदनावर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे लोहारा तालुकाध्यक्ष विवेक बनसोडे, राहुल राजपुत, सतिश पोतदार, अभय कदम, वैभव पांचाळ, सचिन क्षिरसागर, अक्षय कदम, सचिन पवार, अभिषेक भंडारकोठे, प्रतिक थोरात, संदिप अडसुळे, स्वप्निल सोनटक्के यांच्यासह विद्यार्थी व महाराष्ट्र सैनिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.