दैनिक ‘धाराशिव नामा’ च्या प्रथम विशेषांकाचे शानदार प्रकाशन

दैनिक ‘धाराशिव नामा’ च्या प्रथम विशेषांकाचे शानदार प्रकाशन
नव्या पर्वात प्रत्येकांनी स्वयंरोजगार सुरु करावा-आ.राणाजगजितसिंह पाटील
पत्रकारांनी लोकशाहीचा आवाज होण्याची गरज – आ.कैलास पाटील
धाराशिव/न्यूज सिक्सर
देशाची लोकशाही चार स्तंभावर उभी असून चौथा स्तंभ पत्रकारितेचा आहे. पत्रकारांची भूमिका खूप महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. त्या माध्यमातून जिल्ह्याला न्याय मिळेल यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून भूमिका मांडावी. तसेच यापुढे २५ वर्ष वेगळे पर्व सुरू झाले असून बाहेरून कोणीतरी येईल व आपणाला मदत करील अशी परिस्थिती राहिलेली नसल्यामुळे प्रत्येकाने स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दि.१८ मार्च रोजी केले.
धाराशिव येथील समर्थ हॉटेलमध्ये दैनिक धाराशिव नामा वृत्तपत्राच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन मोठ्या थाटात करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आ. कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, रुपामाता उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष ॲड व्यंकटराव गुंड, अमित शिंदे, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, सिद्धिविनायक उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष दत्ता कुलकर्णी, शिवसेनेचे धाराशिव तालुकाध्यक्ष अजित लाकाळ, जिल्हा बँकेचे संचालक संजय देशमुख, मगर, आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आ राणाजगजितसिंह पाटील म्हणाले की, जिल्ह्याच्या विकासासाठी निधी खेचून आणून त्या माध्यमातून विकास करणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. तर माजी मंत्री डॉ पद्मसिंह पाटील यांनी जिल्ह्यामध्ये २१ टीएमसी पाणी आणावे व जिल्ह्यातील सिंचन क्षेत्र वाढावे यासाठी मंत्रिमंडळामध्ये विरोध पत्करून २१ टीएमसी पाण्याचा प्रस्ताव मंजूर करून घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यात लवकरच सोलापूर तुळजापूर उस्मानाबाद या रेल्वे मार्गाचे काम सुरू होईल असे सांगत कडगाव एमआयडीसी मध्ये टेक्सटाईल साठी बैठका झाल्या असल्याचे सांगितले. तर धाराशिव नामा या वृत्तपत्राची सुरुवात लहान असली तरी पुढच्या वर्षी मोठा टप्पा पार पाडलेला असेल व या दैनिकाची प्रचंड प्रगती व्हावी अशी सदिच्छा व्यक्त केली. तर आ. कैलास पाटील म्हणाले की, आमदारकीची निवडणूक लढवेपर्यंत कुठल्यातरी पक्षाचा तो व्यक्ती असतो. मात्र निवडून आल्यानंतर तो सर्व जनतेचा असतो असे सांगत पत्रकारांनी कुठल्याही एका पक्षाच्या किंवा नेत्याच्या बातम्या प्रकाशित करून लेबल लावून घेऊ नये असे आवाहन केले. तसेच पत्रकारांनी जो लोकप्रतिनिधी चुकला असेल तर तो जवळचा आहे म्हणून ती बातमी प्रसारित करण्यासाठी टाळाटाळ न करता व त्यांची कुठलीही मुलाहिजा न बाळगता त्यांची चूक आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून दाखवून देणे गरजेचे आहे. तर त्या लोकप्रतिनिधींनी देखील पत्रकारांनी दाखवून दिलेली चूक समजून घेणे गरजेचे आहे. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेत एकही लोकप्रतिनिधी नाहीत. तर फक्त अधिकाऱ्यांचे राज्य असल्याचे सांगत ज्यावेळेस सत्ता केंद्रित होते त्यावेळी चुकीच्या गोष्टी घडतात असे सांगत भाजपचा नामोल्लेख न करता थेट भाजपवर हल्ला केला. विशेष म्हणजे प्रशासन व लोकप्रतिनिधी यांना एका ट्रॅकवर आणण्याचे काम वृत्तपत्राच्या माध्यमातून पत्रकारांनी करावे असे आवाहन त्यांनी केले. तर २०१८ जिल्ह्याच्या विकासासाठी प्राधान्यक्रम ठरवून दिला होता. त्यानुसार आघाडी सरकारने ७ टीएमसी पाण्यासाठी ७०० कोटींची तरतूद केली होती. मात्र जुलैपर्यंत अंतिम निविदा प्रसारित झाली नाही. तर सरकार कोसळल्यामुळे युतीच्या सरकारने त्यास मान्यता दिली आहे. ७ टीएमसी पाणी येईलच मात्र उर्वरित पाणी आणण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत असे आवाहन त्यांनी केले. विशेष म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर- तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी फक्त केंद्राकडे निधी दे ण्यास असल्याचे पत्र दिले होते. त्याऐवजी कॅबिनेट मंत्रिमंडळाचा ठराव दिला नाही. त्यावेळेसच जर कॅबिनेटचा ठराव घेतला असता तर आजपर्यंत हे प्रकरण मार्गी लागले असते असा आरोप देखील केला. तसेच सर्वांनी सकारात्मक भूमिका घेऊन जिल्ह्याची आकांक्षीत असलेली ओळख पुसण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले. तर भविष्यकाळात धाराशिव नामा महाराष्ट्रातील लोकशाहीचा आवाज करील अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी बोलताना दत्ता कुलकर्णी म्हणाले की, आमदारांना सभागृहात बोलण्यासाठी पाठविलेले आहे. कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्याच्या भूमिकेत पक्षाची भूमिका मांडावी असे सांगत २१ टीएमसी पाणी, रेल्वे आदीचे काय झाले ? याचे उत्तर भाजपाचे अधिकृत आमदार राणाजगजितसिंह पाटील हे सभागृहात देतील असा टोला आ कैलास पाटील यांना लगावला. तसेच कुठलाही उद्योग सुरू करताना त्याचा उत्साह मोठा असतो तोच उत्साह भविष्यात राहिला तर आरंभ शूर हा शूरवीरांभ होतो असे सांगितले. चांगल्या लोकांच्या संपर्कामुळेच चांगले होऊ शकते असे सांगत पत्रकारांनी नवीन टेक्नॉलॉजी, आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच आधुनिक तंत्रज्ञानाची कास पकडून धाराशिव नामा महाराष्ट्रात पोहोचावा अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी ॲड व्यंकटराव गुंड यांनी ग्रामीण भागातील तरुणांनी हे वृत्तपत्र धाडसाने सुरू केले आहे. भविष्यात काही अडचण आली तर मी व रुपामाता उद्योग परिवार कायमस्वरूपी तुमच्यासोबत आहे असे सांगत शुभेच्छा दिल्या. तर मकरंद राजेनिंबाळकर म्हणाले की, दैनिक धाराशिव नामाच्या माध्यमातून जिल्ह्याचे प्रश्न जनतेसमोर मांडावेत असे आवाहन केले. तसेच पत्रकारांनी जे प्रश्न आहेत त्या प्रश्ना बाबत एकाचीच बाजू न मांडता दोन्ही व्यक्तीची बाजू मांडावी. त्याबरोबरच प्रेस नोट पूर्ती पत्रकारिता सीमित न ठेवता शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य पर्यंत कशा पोहोचतील यासाठी प्रयत्न करावेत. तसेच शोध पत्रकारिता करून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा व या वृत्तपत्राच्या माध्यमातून वर्षभरातील कार्य अहवाल पुढील वर्षी मांडावा तो समाजाला दिशा देणारा असावा असे त्यांनी सांगितले. तर अमित शिंदे म्हणाले की गेल्या पंधरा वर्षापासून कडगाव एमआयडीसीमध्ये टेक्सटाइल पार्क उभा करण्यात येईल असे आ. राणाजगजितसिंह पाटील सांगतात. त्यासाठी आमदार राणा पाटील यांनी सत्तेवर लाथ मारून दुसऱ्या सत्ताधारी पक्षामध्ये गेले आहेत. मात्र कालच्या आर्थिक बजेटमध्ये येथील टेक्सटाईल पार्क अमरावतीला गेला असल्याचे सांगत आ पाटील यांच्यावर निशाणा साधला. तसेच जिल्ह्यातील हजारो तरुणांचा लोंडा पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबई, पुणे व इतरत्र जात आहे. त्यामुळे एमआयडीसीमध्ये टेक्सटाईल पार्क कधी सुरु करणार, रेल्वे मार्गाचे काम कधी सुरू होणार व २१ टीएमसी पाणी कधी येणार ? असे प्रश्न करीत धाराशिव नामा या वृत्तपत्राने जनतेचे प्रश्न मांडून लोकप्रतिनिधी धारेवर धरावे असे आवाहन केले. यावेळी प्रशांत रणदिवे, राहुल जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या. प्रस्ताविक दैनिक धाराशिव नामाचे संपादक विनोद वाकले यांनी तर सूत्रसंचालन रमेश पेठे यांनी व उपस्थित यांचे आभार वाकले यांनी मानले. प्रारंभी सोलापूर जनता बँकेच्या इमारतींमध्ये संपर्क कार्यालयाचे उद्घाटन तर कार्यक्रम स्थळी तुळजाभवानी मातेच्या प्रतिमेचे पूजन व दैनिक धाराशिव नामा या अंकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.