न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

सोयाबीन विक्रीच्या नोंदणीसाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ शेतकऱ्यांनी नोंदणी करावी – आमदार राणाजगजितसिंह पाटील

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

सोयाबीन विक्रीच्या नोंदणीसाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांनी नोंदणी करावी – आमदार राणाजगजितसिंह पाटील

तुळजापूर : प्रतिनिधी

बारदान्याचा तुटवडा निर्माण झाल्याने सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू होण्यास विलंब झाला. आता अडचणी दूर झाल्या आहेत. खरेदीला गती आली आहे. खरेदी केंद्र सुरू होण्यास विलंब झाल्यामुळे नाव नोंदणीचा कालावधी वाढविण्यात आला आहे. त्यामुळे सोयाबीन विकण्याची घाई न करता 30 नोव्हेंबरपर्यंत शेतकरी बांधवांनी खरेदी केंद्राकडे नोंदणी करावी. सोयाबीन खरेदीनंतर अवघ्या चार दिवसांत प्रतिक्विंटल चार हजार 892 रुपयांप्रमाणे पेमेंट खात्यात जमा केले जात आहे. शनिवारपर्यंत 60 लाखाहून अधिक रूपये शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्गही करण्यात आले असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

धाराशिव जिल्ह्यातील 17 हमीभाव खरेदी केंद्रांवरून सोयाबीन खरेदी सुरू झाली आहे. सुरूवातीच्या काळात सोयाबीनचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे खरेदी प्रक्रियेत विलंब निर्माण झाला होता. फेडरेशनकडे पाठपुरावा करून बारदाना निविदा प्रक्रिया तातडीने राबवून जिल्ह्यासाठी आवश्यक असलेला बारदाना उपलब्ध करून घेतला आहे. हमीभाव केंद्रांवर खरेदी प्रक्रियेला आता गती आल्यामुळे खुल्या बाजारात सोयाबीनचे दर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांनी सोयाबीन विकण्याची घाई न करता नोंदणीसाठी दिलेल्या पुढील 10 दिवसांच्या मुदतवाढीचा उपयोग करून घ्यावा. बारदाना मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्यानंतर सोयाबीन खरेदी खरेदीला मोठी गती मिळत असल्याचे दिसून येत आहे. ज्या शेतकर्‍यांनी फेडरेशनकडे नोंदणी केलेली नाही, त्यांनी तातडीने नोंदणी करून सोयाबीन खरेदी केंद्रावरच सोयाबीनची विक्री करावी, असे आवाहनही पाटील यांनी केले आहे.

जिल्ह्यातील भूम, दस्तापूर, गुंजोटी, ईट, नळदुर्ग, कळंब, वाशी, उमरगा, धाराशिव, सोन्नेवाडी, चिखली, शिराढोण, टाकळी बें, तुळजापूर, कानेगाव, कनगरा, चोराखळी आदी 17 ठिकाणी खरेदी केंद्र सुरू झाले आहेत. आतापर्यंत 12 हजार 100 शेतकर्‍यांनी फेडरेशनकडे नोंदणी केली असून 320 शेतकर्‍यांच्या सात हजार 300 क्विंटल सोयाबीनची खरेदी पूर्ण झाली आहे. त्यापैकी 60 शेतकर्‍यांच्या खात्यावर बाराशे क्विंटल सोयाबीन खरेदीपोटी 60 लाखाहून अधिक पेमेंट जमा झाले आहे. यापूर्वी नोंदणीसाठी 15 नोव्हेंबर ही मुदत देण्यात आली होती. मात्र अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे नोंदणीसाठी मुदतवाढ करण्यात यावी, यासाठी आपण आग्रही मागणी केली होती. त्यानुसार 30 नोव्हेंबरपर्यंत नोंदणीचा कालावधी वाढविण्यात आला आहे. जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांनी सोयाबीन विक्री करण्याची घाई न करता लवकरात लवकर नोंदणी करून घ्यावी, असे आवाहनही आमदार पाटील यांनी केले आहे.

चार दिवसात पेमेंट खात्यात जमा
यापूर्वी हमीभाव खरेदी केंद्रात विक्री केलेल्या सोयाबीनचे पैसे मिळावेत, यासाठी चकरा माराव्या लागत होत्या. मात्र आता चार दिवसांच्या आत शेतकर्‍यांच्या खात्यावर सोयाबीनचे पैसे जमा होत आहेत. दस्तापूर व धाराशिव केंद्रावर सोयाबीन विक्री केलेल्या शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर 60 लाख 97 हजार रूपये जमा करण्यात आले आहेत. खरेदी केंद्रावर 12 टक्के आर्द्रतेचा निकष आहे. वाहतूक खर्चाचे नुकसान टाळण्यासाठी सोयाबीन हमीभाव केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी नेण्यापूर्वी आर्द्रतेची तपासणी करून घ्यावी, असे आवाहनही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे