
लोहारा-प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील खेड येथे गावातच मोबाईल कंपनी चे टॉवर उभे करताना भला मोठा खोदकाम करून आजूबाजूच्या च्या घराला तडे जाऊन नुकसान होत आहे.तरी सदर टॉवर उभा करण्याचे काम थांबवावे आणि या टॉवर उभा करण्यासाठी गैर प्रकारे न हरकत प्रमाणपत्र मिळवले आहे तरी याची चौकशी करून न्याय द्यावा अशी मागणी खेड येथील नागरिकांनी जिल्हाधिकारी,पंचायत समिती,लोहारा तहसील कार्यालय यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
२०२३ साली खेड ग्रामपंचायत मध्ये सरपंच, उपसरपंच आणि चार सदस्य यांचे पदे रिक्त होती.त्यावेळी प्रशासक नियुक्त असताना मोबाईल टॉवर कंपनी ने गैर प्रकारे न हरकत प्रमाणपत्र दि.२७ डिसेंबर२०२३ रोजी मिळवले. ग्रामपंचायत आणि नागरिक यासाठी हरकत घेत असताना ही टॉवर उभा करण्याची मंजुरी मिळवली.
ग्रामपंचायत मधील सरपंच उपसरपंच अन्य सदस्य रिक्त पदे भरल्यानंतर दि.१४ मार्च २०२४ रोजी दिलेले ना हरकत प्रमाणपत्र रद्द केले त्यानंतर टॉवर उभा करणे काम थांबविण्यात आले. परंतु दि.२६ जुलै २०२४ रोजी परत पोलीस बंदोबस्तात टॉवर उभारणी काम सुरू केले आहे.तरी गावातील पंडीत मारुती पाटील,भालचंद्र रामराब गव्हाळे, गुलाब शिवनारायण झंवर यांच्या घराच्या भिंत पडल्या आहेत याबाबत निवेदन देऊन ही प्रशासकीय अधिकारी,ग्रामविकास अधिकारी काम थांबवित नाहीत असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.