टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या वतीने 136 कुटुंबांना 136 शेळ्यांचे वाटप

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या वतीने 136 कुटुंबांना 136 शेळ्यांचे वाटप
तुळजापूर /न्यूज सिक्सर
टाटा सामाजिक विज्ञान संस्था, तुळजापूर या संस्थेच्या वतीने आपत्तीच्या पलीकडे या प्रकल्पांतर्गत लोहारा तालुक्यातील मार्डी, बेंडकाळ व नागराळ या गावांतील निराधार, विधवा, एकल, अत्यल्प भूधारक व भूमिहीन 136 कुटुंबांना शाश्वत उपजिविकेचे साधन व शेतीपुरक व्यवसाय करण्यासाठी मा. तहसिलदार, लोहारा श्री संतोष रुईकर, टाटा संस्थेचे उप संचालक प्रो. रमेश जारे, प्रकल्प लीडर डॉ जॅकलिन जोसेफ, प्रकल्प समन्वयक श्री. गणेश चादरे यांच्या शुभहस्ते पहिल्या टप्यामध्ये 71 व दुसऱ्या टप्यामध्ये 65 अशा एकूण 136 शेळ्यांचे वाटप करण्यात आले आहे.
या प्रसंगी प्रकल्प समन्वयक गणेश चादरे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, 2017 पासुन संस्थेमार्फत राबविण्यात आलेल्या पाणलोट क्षेत्रविकास, वृक्ष लागवड, चारा पिकांच्या बियाणांचे वाटप, पंचायतीराज प्रशिक्षण कार्यक्रम, शेती कौशल्य आधारीत प्रशिक्षण कार्यक्रम व शेतीपुरक व्यवसाय म्हणून शेळीपालन गटातील सदस्यांना शेळ्यांचे वाटप अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला चालना देण्याचे कार्य करण्यात येत आहे. टाटा संस्थेच्या वतीने पहिल्या टप्यामध्ये 71 शेळ्यांचे वाटप करण्यात आले होते. 71 शेळ्यांपासुन 155 बोकड व 60 पाठी अशा 215 शेळ्या झाल्या त्यामुळे गटातील महिलांना त्यातुन मिळालेल्या उत्पन्नातून मोठा फायदा झाला आहे. पहिला टप्पा यशस्वी झाल्यानंतर दुसऱ्या टप्यामध्ये नव्याने 65 महिलांचा शेळीपालन गट तयार करून गटातील 65 महिलांना 65 शेळ्यांचे वाटप करण्यात आले. विशेष करून या गटांमध्ये ज्या व्यक्ती निराधार,एकल व वयोवृध्द आहेत. अशांना आर्थिक हातभार देण्यासाठी अर्धालीवर शेळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना मोठा आर्थिक व मानसिक आधार मिळाला आहे. भविष्यात ही प्रक्रिया अशीच चालू ठेवण्यात येणार असल्याचे गणेश चादरे यांनी सांगितले.
या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून
तहसिलदार श्री संतोष रुईकर म्हणाले की, टाटा संस्थेचे कार्य हे महिला सक्षमीकरनाला व ग्रामीण विकासाला हातभार लावणारे आहे. भविष्यात शेतकऱ्यांनी शेळीपालन व्यवसाया बरोबरच मोठ्या प्रमाणात तुती लागवड करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आव्हान केले.
टाटा संस्थेचे उप संचालक प्रो. रमेश जारे म्हणाले की, शेतकऱ्यांनी शेती बरोबरच शेतीला पुरक व्यवसाय म्हणून शेळीपालन याकडे मोठ्या प्रमाणात वळणे आवश्यक असल्यामुळे आम्ही संस्थेच्या माध्यमातून शेळ्यांचे वाटप केले आहे. आजवर संस्थेने केलेल्या मार्गदर्शनाचा लाभ घेवून महिला या आर्थिक दृष्ट्या सक्षम होत असल्याचा आनंद होत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून गावांचा शाश्वत विकास होण्याच्या दृष्टिकोनातून हे महत्वपूर्ण पाऊल आहे. भविष्यात सेंद्रिय शेती व पंचायतीराज व्यवस्था अधिक बळकट करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी प्रकल्प लीडर डॉ. जॅकलिन जोसेफ म्हणाले की, तिन्ही गावच्या महिला व शेतकरी अतिशय मेहनती आहेत. त्यांचा या प्रकल्पातील सहभाग हा अतिशय महत्वपूर्ण राहिला आहे. गटातील अनेक महिलांनी शेळी पालन व्यवसायाच्या माध्यमातून विविध व्यवसाय उभे केले आहेत ही आदर्श घेण्यासारखी बाब आहे. गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी टाटा संस्था ही सतत प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मार्डी येथील शेळीपालक महिला सुनंदा मल्हारी देवकर म्हणाल्या की, टाटा संस्थेने मला दिलेल्या एका शेळीवरती माझ्याकडे दोन शेळ्या व चार बोकड झाले. मी बोकड विक्रितुन आलेल्या पैशातून चटणी कांडप मशीन घेतली आहे. त्यातून ही मला आर्थिक फायदा होत आहे. भविष्यात मी मोठ्या प्रमाणात शेळीपालन व्यवसाय वाढवणार आहे.
बेंडकाळ येथील शेळीपालक महिला शांता मोरे म्हणाल्या मला दिलेल्या एका शेळीपासुन मी दुधाचे 1600 रुपये कमावले आहेत व बोकड विक्रीतून 25000 हजार कमावले आहेत. टाटा संस्थेचे कार्य हे आमच्या सारख्या महिलांना स्वयंपूर्ण करण्यासाठी मोलाची भुमिका बजावत आहे.
नागराळ येथील शेळीपालक महिला सुवर्णा माटे म्हणाल्या की, टाटा संस्थेने मला दिलेल्या एका शेळीवरती माझ्याकडे आज तीन शेळ्या व दोन बोकड झाले आहेत. शेळीपालन व्यवसाय हा माझ्या कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरला आहे.
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आनंद भालेराव यांनी मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री गणेश चादरे श्री शंकर ठाकरे, आनंद भालेराव, दत्ता सोनवणे विनोद कांबळे यांनी अथक परिश्रम घेतले.