विकास पांढरेंनी इटकळच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा ; रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी व मणिपाल विद्यापीठाची फेलोशिप जाहीर

विकास पांढरेंनी इटकळच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा ; रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी व मणिपाल विद्यापीठाची फेलोशिप जाहीर
मुंबई /न्यूज सिक्सर
‘कृषी विवेक’ (सा.विवेक समूह मुंबई)चे कार्यकारी संपादक विकास पांढरे यांना नेतृत्व, प्रशिक्षण व संशोधन कार्यात अग्रेसर असलेल्या मुंबई येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी व मंगलोर (कर्नाटक) येथील मणिपाल विद्यापीठाची अत्यंत मानाची समजली जाणारी ‘उडान फेलोशिप’ जाहीर करण्यात आली आहे. ५ फेब्रुवारी,२०२४ रोजी, मंगलोर येथे दीक्षान्त समारंभ आयोजित करण्यात आला. त्यावेळी पांढरे यांना फेलोशिप प्रदान करण्यात येणार आहे. यामुळे इटकळ (ता.तुळजापूर)गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
‘महाराष्ट्रातील श्रीधान्यांची (भरडधान्य) सद्यस्थिती व मूल्यसाखळी विकास’ हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. महाराष्ट्र भर प्रवास करून सुमारे २१२ पृष्ठांचा प्रबंध विद्यापीठासमोर सादर केला आहे. ‘महाराष्ट्राचे कृषिनायक’ व ‘गोष्टी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या ‘ या संदर्भमूल्य ग्रंथाचे पांढरे यांनी लेखन व संपादन केले आहे. याखेरीज कृषी विषया संदर्भात १००हून अधिक लेख लिहिले आहेत. त्यांच्या चिंतनातून आता कृषी संशोधनात मोलाची भर पडली आहे. सोमवार, ५ फेब्रुवारी,२०२४ रोजी मणिपाल विद्यापीठ, मंगलोर (कर्नाटक) येथे पांढरे यांचा फेलोशिप दीक्षान्त समारंभात सन्मान करण्यात येणार आहे. त्यांच्या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.