
लोहारा-प्रतिनिधी
देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजे ७ मे ला धाराशिव लोकसभेसाठी मतदान होणार आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार विध्यमान खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर निश्चित झाले असले तरी त्यांच्या समोर पारंपारिक राजकीय प्रतिस्पर्धी आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी महायुती च्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांचे कडवे आव्हान असणार आहे.
अर्चनाताई पाटील यांना उमेदवारी मिळाल्याने महायुतीतील भाजपा,शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील इच्छुकांची भूमिका काय असणार? अर्चना पाटील यांना स्थानिक राष्ट्रवादी,भाजप,शिवसेना कार्यकर्त्यांची साथ किती मिळणार ? तर जनसामान्यां पर्यंत पोहचनारे खासदार ओमराजे निंबाळकर यांना मतदार परत लोकसभेत पाठवणार का? असे अनेक गणितं मतदार आणि कार्यकर्त्यांवर अवलंबून असणार आहेत.
राज्यात गेल्या दीड-दोन वर्षांपासून शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष फुटफुटीच्या राजकारणात कार्यकर्ते अडगळीत पडलेले आहेत.लोकसभा निवडणूक तोंडावर नेते,गाव पुढारी आणि कार्यकर्ते यांना आता चांगलाच भाव मिळेल असे दिसुन येते.आमच्या नेत्याला तिकीट दिले नाही म्हणून राजीनामा देणारे पदाधिकारी,कार्यकर्ते सध्या नेत्यांच्या भूमिकेकडे पाहत आहेत.गाव पुढारी ही गावागावात सक्रिय झाले आहे.साधी ग्रामपंचायत ताब्यात घेता आली नाही.गाडीच्या खाली उतरून नागरिकांची विचारपूस केली नाही असे पुढारी ही लोकसभा निवडणूक तोंडावर पक्षाचे पद आहे असे सांगत सक्रिय झाल्याचे दिसते.त्यामुळे विविध पक्षांचे पदाधिकारी आता कार्यकत्यांची आस्थेने विचारपूस करीत असल्याने कार्यकर्त्यांची पुन्हा कॉलर टाइट झाली आहे.
लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आणि कार्यकर्त्यांना सुगीचे दिवस येऊ लागले आहेत. लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीची शक्यता आहे.लोकसभेमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ही विधानसभा निवडणुकीनंतर होणार हे निश्चित मानले जात आहे.पण सध्या जिल्हा परिषद,पंचायत समिती,नगरपालिका,नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी इच्छुक असलेले उमेदवार आता लोकसभा विधानसभा निवडणुकीसाठी कामाला येणार आहेत.गावात जनसंपर्क वाढविण्यासाठी नेतेमंडळींची सुख- दुःखाच्या प्रसंगी,साखरपुडा समारंभ आणि लग्न सोहळ्यास आवर्जून हजेरी लावताना दिसून येत आहेत.पक्ष फुटफुटीच्या अडगळीत पडलेल्या कार्यकर्त्यांची आठवण नेत्यांना होणार हे साहजिकच आहे.