न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

माता रमाईच्या जीवनमुल्यांचा प्रवास प्रेरणादायी व्याख्यानमालेत साहित्यिक रवींद्र केसकर यांचे प्रतिपादन

माता रमाईच्या जीवनमुल्यांचा प्रवास प्रेरणादायी
व्याख्यानमालेत साहित्यिक रवींद्र केसकर यांचे प्रतिपादन
धाराशिव/न्यूज सिक्सर
दुःख, त्याग, समजुतदारपणा, कारूण्य, मानवतेचा अमूल्य संगम म्हणजे माता रमाई होय. माता रमाईंच्या जीवनमुल्यांचा प्रवास चिरंतन प्रेरणादायी असल्याचे मत साहित्यिक रवींद्र केसकर यांनी व्यक्त केले.
महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी सायंकाळी शहरातील क्रांतीचौकात आयोजित व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. ज्योती बडे उपस्थित होत्या. यावेळी छाया माळाळे, नंदू चव्हाण, शकुंतला शिंगाडे, अर्चना शिंगाडे, नंदाताई बनसोडे, अत्रे, कमल चव्हाण यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना रवींद्र केसकर म्हणाले की, रमाई ही केवळ एक व्यक्ती नव्हती, तर ती मातृत्वाचे महाकाव्य आहे. रमाईचा जन्म जरी गरिबी, दारिद्य्र आणि अज्ञानात झालेला असला तरी तिने केलेल्या कार्याची, त्यागाची श्रीमंती अजरामर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे कुठलीही तक्रार न करता त्यांच्या कार्यात रमाईने स्वतःला वाहून घेतले. रमाईच्या आयुष्यात अपार दुःखे तिच्या वाट्याला आली. दुःखे हरली, परंतु रमाई हरली नाही. रमाई मनाला मनाशी जोडून घेणारी होती. कष्ट आणि दुःख यावर जन्मदात्या आईने दिलेला मूलमंत्र दुःख आणि कष्टच माणसाला मोठे करतात, या विचाराने विजय मिळविला. मूल्य, संस्कार हे जाती किंवा रक्ताशी नाही, तर विचारांशी निगडीत असतात, हे रमाईने आपल्या कृतीतून दाखवून दिले. म्हणून ती सर्वांची आई झाली, असेही केसकर यांनी नमुद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाल शिंगाडे यांनी केले. यावेळी महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून अभिवादन करण्यात आले. अंबिका आगळे या तरूणीने आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष अ‍ॅड. बडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी आंबेडकरी चळवळीतील पँथर नेते यशपाल सरवदे यांना आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुगत सोनवणे, महेश डावरे, सत्यजित माने, बंटी शिंगाडे, अविनाश शिंगाडे, राजपाल गायकवाड, विनोद रोकडे यांनी परिश्रम घेतले. यावेळी परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
चौकट….
रावसाहेब कसबे यांचे आज व्याख्यान
महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित तीन दिवसीय व्याख्यानमालेचा आज तिसरा दिवस आहे. आज ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब कसबे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर ः एक मुक्तचिंतन या विषयावर व्याख्यान देणार आहेत. शहर व परिसरातील युवक, नागरिकांनी व्याख्यानमालेस उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजक विशाल शिंगाडे यांनी केले आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे