शिवलाड तेली समाजाच्या ( सोलापूरच्या ) मानाच्या काठ्या तुळजापुर मध्ये स्वागत
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

शिवलाड तेली समाजाच्या ( सोलापूरच्या ) मानाच्या काठ्या तुळजापुर मध्ये स्वागत
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
श्री क्षेत्र तुळजापुर हे स्थान आदिशक्ती पीठ म्हणून लाखो घराण्याची कुलदेवता म्हणून ओळखले जाते . देशात जगन्माता आदीशक्तीची ५१ पीठे आहेत. त्यापैकी साडेतीन पीठे महाराष्ट्रात असून तुळजापूरची श्री .तुळजाभवानी हे एक पूर्ण पीठ आहे. असुरनिर्दालिनी, महिषासुरमर्दिनी आदीशक्ती तुळजाभवानी हे जागृत शक्तीपीठ समजले जाते.
हिंदवी स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज व भवानी माता यांचे संबंध म्हणजे आपली आराध्य कुलदैवत व भक्त यांचे उत्कट उदाहारण होय. अनेक शिवकालीन परंपरांचा आविष्कार तुळजापुरात दिसून येतो. या परंपरा, प्रथा, रितीरिवाज यातून प्रकटणारे सांस्कृतिक लोकजीवनाचे भावतरंग आनंददायी भक्तीपूर्ण असतात. शिवलाड तेली समाजाच्या ( सोलापूरच्या ) मानाच्या काठ्याच्या स्वागतास तुळजापुर नगरी सज्ज होतीप्रतिवर्षीच्या प्रथेपरंपरेप्रमाणे तीर्थक्षेत्र तुळजापुरात आई तुळजाभवानीच्या अश्विनी पौर्णिमा यात्रामहोत्सवात दाखल होणाऱ्या सोलापूर येथील शिवलाड तेली समाजाच्या मानाच्या काठ्यांच्या स्वागतास तुळजापूर नगरी सज्ज होती.
प्रतिवर्षी अश्विनी पौर्णिमेला सोलापूर नगरीच्या मानाच्या काठ्या भक्ती (घाटशीळ ) मार्गे तळजापूर नगरीत जगदंबेच्या गजरात अती उत्साहात प्रवेश करतात. शहराचे प्रथम नागरिक म्हणून तुळजापूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष यांच्या वतीने त्यांचे मनोभावे स्वागत करण्यात येते. तुळजाभवानी देवीच्या शारदीय महोत्सवाच्या घटोत्थापनेनंतर देवीचे नगरहून आलेल्या पालखीतून सिमोल्लंघन परिक्रमा पार पडून पलंगावर देवीची पाच दिवसांची श्रमनिद्रा प्रारंभ होते. पाच दिवसांच्या निद्रेनंतर अश्विनी पौर्णिमेच्या पहाटे देवी सिंहासनावर प्रतिष्ठापित होऊन भक्तांच्या इच्छापूर्तीस सज्ज होते. या पौर्णिमेस श्री सिद्धारामेश्वराच्या पावननगरी सोलापूर येथून आदीशक्तीच्या दर्शनास मंठाळकर आणि काटकर या घराण्याच्या मानाच्या काठ्या परंपरेनुसार प्रतिवर्षी श्रीक्षेत्र तुळजापूर येथे मिरवणुकीने दाखल होतात सोलापूर ते तुळजापूर या मार्गावर लाखो भाविक पायी चालत येतात. आबालवृद्ध, स्त्री, पुरुष अती भक्तीने, जगदंबेच्या दर्शनाच्या आसक्तीने आई राजा उदो उदोच्या गजरात पायी चालत तुळजाभवानी मातेची वारी पूर्ण करतात.
पूर्वपरंपरेनुसार तुळजामातेचे माहेर घर सिंदफळ आहे . येथे मुक्काम आणि पौर्णिमेस तुळजापूरनगरीत सकाळी नऊ च्या सुमारास घाटशीळ मार्गे प्रवेश करून आलेल्या भक्तांसह दोन्ही काठ्या भोपे पुजारी सचिन पाटील, संभाजीराव पाटील, प्रशांत पाटील, शिवराज पाटील यांच्या निवासस्थानी थांबतात.
पौर्णिमेच्या रात्री जगदंबेच्या छबिन्यात रात्री हजेरी देतात.सोबत हजारो भक्त, गोंधळी, आराधी, वासुदेव यांच्यासह सवाद्य शिवलाड तेली समाजाच्या मानाच्या काठ्यांसह आई तुळजाभवानी मातेच्या छबीना काढण्यात येतो. छत्री, अब्दागिरी, चवऱ्या दिवटे, पोतांसह निघालेल्या देवाच्या अश्विनी पौर्णिमा उत्सवातील छबीना मिरवणूक अवर्णनीय असते. भान विसरून आराधी, गोंधळी देवीचा गजर करत असतात. पोर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी कल्लोळ तीर्थात दोन्ही काठीवाल्यांचे शेकडो भक्त स्नानास जातात. इच्छापूर्तीसाठी चांदीचा तोडा, पाटल्या, मुकुट अर्पण करतात, ते मनोगत पूर्ण होतात असे भक्तमधून बोलले जाते. दोन्ही काठ्याची सकाळी नऊ वाजता पंचपदी आरती, हळदी ,कुंकू वाहून केली जाते. काठ्यांचे मानकरी काटकर श्री तुळजाभवानी देवीस गोड, तिखट आणि परत प्रस्थान करतेवेळी दहीभाताचे जेवण देतात.
वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरेनुसार शारदीय नवरात्र महोत्सवापासून अश्विनी पौर्णिमेपर्यंत चालणाऱ्या तुळजाभवानी मातेच्या महोत्सवाची पौर्णिमेच्या सोलापूर येथून आलेल्या शिवलाड तेली समाजाच्या मानाच्या काठ्यांसह रविवार दि .२९ ऑक्टोंबर रोजी छबीना तसेच दि .३० ऑक्टोबर अन्नदान महाप्रसाद, रात्री छबीना मिरवणूक संपन्न होऊन यात्रा महोत्सवाची सांगता होते.