डॉ कल्पना माळी यांनी यूपीएससी परीक्षेत मारली बाजी

डॉ कल्पना माळी यांनी यूपीएससी परीक्षेत मारली बाजी
मुरुम/न्यूज सिक्सर
डॉ. कल्पना माळी मुळच्या भुसणी, ता. उमरगा येथील महादेव पाटील यांची जेष्ठ कन्या. त्यांची केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयात सहाय्यक कमांडंट वैद्यकीय अधिकारी (गट-अ) म्हणून नुकतीच निवड झाली आहे. त्या विद्यार्थी दशेपासूनच अभ्यासू व होतकरु होत्या. त्यांनी गावातील प्रतिभा निकेतन विद्यालयातून इयत्ता १० वी विशेष प्राविण्याने उत्तीर्ण केली होती. गुणात्मक व दर्जात्मक शिक्षण घेण्याच्या हेतूने लातूर येथील सोनवणे कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता ११ विज्ञान शाखेत प्रवेश मिळविला. ग्रामीण भागाची पार्श्वभूमी लाभल्याने त्यांनी मेहनत व सातत्यपूर्ण प्रयत्नाच्या जोरावर बारावीत देखील विशेष प्राविण्य मिळविले. पुढे वैद्यकीय चाचणी परीक्षेत देखील त्या मागे राहिल्या नाहीत. गुणवत्तेच्या आधारावर त्यांनी सोलापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून एमबीबीएस पदवी विशेष श्रेणीत उत्तीर्ण केली. ग्रामीण भागात शिक्षण घेऊन प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी वैद्यकीय पदवी प्राप्त झाल्यानंतर खाजगी दवाखाना सुरु न करता. केवळ परिसरातील रुग्णांची सेवा करता यावी म्हणून त्यांनी प्रथम मुरूम येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात रुजू झाल्या. सलग दोन वर्षे वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांनी उत्कृष्ट रुग्णसेवा केली. त्यानंतर पुणे येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालय, सास्तुर, ता. लोहारा येथील स्पर्श रुग्णालय, उमरगा येथील साई हॉस्पिटल आणि सांगली येथील भारती विद्यापीठातील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून सध्या त्या कार्यरत आहेत. या संपूर्ण कार्यकाळात जिद्द, चिकाटीच्या जोरावर त्यांनी यूपीएससीमध्ये (गट-अ) मध्ये येण्यासाठी स्वप्न उराशी बाळगून अहोरात्र परीक्षेची तयारी केली. सन २०२२ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या वैद्यकीय अधिकारी (गट-अ) परीक्षेत उत्तीर्ण होऊ तोंडी मुलाखतीमधून त्यांची निवड झाली होती. त्यांची निवड झाल्याचे नुकतेच कळविण्यात आले आहे. डॉ. कल्पना माळी यांचा विवाह बिहार राज्यात कार्यरत असलेले आयपीएस अधिकारी राहुल भरत माळी यांच्याशी सोलापूर येथे गतवर्षी झाला होता. ते सन २०१९ बँचचे आयपीएस अधिकारी आहेत. लग्नानंतर पतीच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी या परीक्षेची जोरदार तयारी केली होती. त्यांच्या या यशाबद्दल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शरणजी पाटील, नगर शिक्षण विकास मंडळाचे सचिव व्यंकटराव जाधव गुरुजी, प्राचार्य डॉ. अशोक सपाटे आदींनी त्यांचे विशेष अभिनंदन केले. श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी एम. सी. पाटील यांच्या त्या ज्येष्ठ कन्या आहेत. या त्यांच्या यशाबद्दल परिसरातून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे. फोटो ओळ : भुसणी, ता. उमरगा येथील डॉ. कल्पना माळी व त्यांचे पती राहूल माळी