
लोहारा (प्रतिनिधी)
दि.१० डिसेंबर मानवाधिकार दिनाचे औचित्य साधून लोहारा तालुक्यातील सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. मागील ३ ते ४ महिन्यापासून बांगलादेशामध्ये अल्पसंख्यांक असलेल्या हिंदूवर होत असलेला अन्याय, अत्याचार व तेथील हिंदूचे श्रद्धास्थान असलेले इस्कॉन मंदिराचे पुजारी स्वामी चिन्मय कृष्णदास यांना अटक करून तुरुंगात डांबले व मंदिर नष्ट करण्यात आले. या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण भारत देशभरात हिंदूच्या वतीने सामूहिक निषेध मोर्चे काढण्यात आले.यावेळी लोहारा शहरात छ.शिवाजी महाराज चौक,महात्मा फुले चौक,डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, हिप्परगा रोड,जगदंबा देवी मंदिर,नागराळ रोड ते लोहारा तहसील कार्यालय या मार्गाने लोहारा तालुक्यातील हिंदू समाजाच्या वतीने तहसिल कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.याप्रसंगी लोहारा तहसील कार्यालयाचे तहसीलदार रणजितसिह कोळेकर यांना उपस्थित हिंदू समाजाच्या वतीने बांगलादेशातील हिंदूचे धार्मिक स्थळांचे संरक्षण करून हिंदू धर्माचाऱ्यांची सुटका करावी तसेच तेथील हिंदुंवर होणाऱ्या अत्याचारावर प्रतिबंध घालावा, यासाठी जागतिक मानवाधिकार आयोगाने लक्ष घालून बांगलादेशातील हिंदूची मालमत्ता व जिविताचे संरक्षण करण्यास बांगलादेशातील सरकारला भाग पाडावे व भारत सरकारने बांगलादेशावर दबाव टाकून हिंदूच्या जीविताचे संरक्षण करावे अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले. या निषेध मोर्चामध्ये लोहारा तालुक्यातील हिंदू बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.