मुरूम बाजार समितीवर एकहाती सत्ता राखून महाविकास आघाडीने मारली बाजी

मुरूम बाजार समितीवर एकहाती सत्ता राखून महाविकास आघाडीने मारली बाजी
मुरुम/न्यूज सिक्सर
मुरूम येथील कृषी उत्पन्न बाजार समिती ही मराठवाड्यातील एक नामांकित कृषी उत्पन्न बाजार समिती समजली जाते. या समितीच्या स्थापनेपासूनच गेल्या ५० वर्षाची काँग्रेस पक्षाची परंपरा व एकहाती असलेली सत्ता कायम राखण्यात महाविकास आघाडीने सर्वतोपरी प्रयत्न करून पुन्हा एकदा सत्ता काबीज केली आहे. दिवंगत माधवराव उर्फ काका पाटील यांनी या परिसरात समाजकारणातून राजकारण केले. पुढे हीच परंपरा महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील चालवित आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसने महाविकास आघाडीच्या पॅनलकडून ही निवडणूक लढवली. जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील यांच्या नियोजनबध्द नेतृत्वाखाली महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलचे मुरूम कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक-२०२३ लढविण्यात आली. या निवडणुकीमध्ये काकांच्या खांद्याला खांदा लावून महाराष्ट्र युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष शरणजी पाटील यांनी या निवडणुकीत सक्रिय सहभाग घेऊन मतदारांशी संवाद साधला. एकूण १८ उमेदवारापैकी १५ उमेदवार महाविकास आघाडीने निवडून आणण्यात त्यांनी प्रयत्नाची बाजी लढवली. या बाजार समितीत अनुसूचित जाती मतदारसंघातून महाविकास आघाडीचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आलेला आहे. दरम्यान भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांची ही जोरदार फील्डिंग सुरू होती परंतु मतदारांनी मतदानाच्या रूपाने फारसा कौल दिला नाही केवळ महायुतीच्या पॅनलकडून ३ उमेदवार निवडून आले आहेत. शनिवारी (ता. २९) रोजी नगर परिषदेच्या सभागृहामध्ये मतदान प्रक्रिया पार पाठली. यामध्ये सहकारी संस्था मतदार संघ सर्वसाधारण गटातून बापूराव पाटील (२२७), बसवराज कारभारी (२२४), बसवराज पाटील (२२०), सुधाकर पाटील (२१७), गोविंद पाटील (२१७), नेताजी कवठे (२१५), बसवराज वरनाळे (२१४ ) असे ७ व सहकारी संस्था मतदार संघ इतर मागासवर्गीय गटातून पंकज स्वामी (२२३) असे १ एकूण ८ उमेदवार निवडून आले. सहकारी संस्था विमुक्त जाती-जमाती गटातून महाविकासचे विजयानंद सोनकटाळे (२३५) मते घेऊन विजयी झाले. ग्रामपंचायत मतदार संघ सर्वसाधारण गटातून महायुतीचे सोमनाथ पाटील (१८०) तर महाविकास आघाडीचे दौलाप्पा तोरकडे (१७७) असे दोन उमेदवार विजयी झाले. तसेच ग्रामपंचायत मतदार संघ आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातून महाविकास आघाडीचे महानिंगप्पा बाबशेट्टी (१७९) निवडून आले. सहकारी संस्था मतदार संघ महिला (राखीव) गटातून महाविकास आघाडीकडून मंगलबाई लामजणे (२२८), सुचिता जाधव (२२३) अशा . दोन महिला उमेदवार विजयी झाल्या. व्यापारी-आडते मतदार संघातून महाविकास आघाडीचे धनराज मंगरुळे (७५) तर महायुतीचे सुरेश मंगरुळे (७७) असे दोन उमेदवार विजयी झाले. हमाली-मापाडी मतदार संघातून महायुतीचे शिवाजी दूधभाते (३२) मतदान घेऊन विजयी झाले. मुरूम बाजार समिती महाविकास आघाडी निवडणूक निकालानंतर दोन्ही पॅनेलच्या विजयी उमेदवारांचे गुलाल उधळून व फटाके फोडून जंगी स्वागत करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डी. जी. मोरे यांनी काम पाहिले तर सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छीन्द्र शेंडगे, सपोनि पंकज इंगळे यांनी बंदोबस्तासाठी पोलीस पथकासमवेत हजर होते. फोटो ओळ : मुरुम ता. उमरगा येथे बाजार समितीवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये गुलाल उधळून जल्लोष साजरा करताना