माकणी येथील गयाबाई प्रभाकर शिंदे यांचा आदर्श माता – आदर्श नारी पुरस्काराने गौरव
Post-गणेश खबोले

लोहारा-प्रतिनिधी
अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघ संलग्नित ‘ महारष्ट्र राज्य शिक्षक परिषद ‘ यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रीशताब्दी जयंती वर्षानिमित्त धाराशिव जिल्ह्यातील कर्तबगार महिलांचा ‘आदर्श माता-आदर्श नारी’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. माकणी गावातील उच्च शिक्षित कुटुंब घडवणाऱ्या श्रीमती गयाबाई प्रभाकर शिंदे यांना दि २३ मार्च रोजी सदर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुरस्कार्थी गयाबाई आणि त्यांचे पती प्रभाकर शिंदे हे पूर्ण अशिक्षित होते. घरामध्ये बारमाही दारिद्र्य, अतिशय हलाकीची परिस्तिथी, पती सालगडी म्हणून कामे करत आणि या घरातील शेळ्या पालन करणे, खुरपणी करणेअसे पडेल ती कामे केली. आपल्या वाट्याला जे दारिद्र्य, गरिबी आलीय, ती लेकरांच्या नशिबी येऊ द्यायची नाही, काहीही झालं तरी लेकरांना शाळा शिकवायची या मतावर मात्र दोघे ठाम होते. पती प्रभाकर शिंदे यांचे निधन झाल्यानंतर दोघांनी एकत्र पाहिलेल्या स्वप्नांचा पाठपुरावा त्यांनी अखंड चालू ठेवला. कुटुंबाला गरज असतानाही केवळ आपल्या मुलांचे भविष्य उज्वल व्हावे म्हणून स्वतःच्या काळजावर दगड ठेवून मुलांना पुण्यासारख्या ठिकाणी स्वतःपासून दूर पाठवले होते. स्वतःचे अश्रू पुसत अनेक आव्हानात्मक परिस्थितीला थोंड देत, लेकरांना त्यांच्या आयुष्यात आलेल्या वादळांना सामना करण्यास शिकवले. लेकरांना कधी रागावून तरी कधी मायेन समजावून घडवले.
सर्व लेकरांना मानसिकदृष्ट्या कधीच खचू दिले नाही. त्यांची मुले महादेव प्रभाकर शिंदे यांचे शिक्षण रसायनशास्त्र या विषयात सेट , नेट (JRF), पी. एच. डी (पुणे विद्यापीठ), पोस्ट डॉक्टरेट (साऊथ कोरियातून) त्याच बरोबर विशेष बाब म्हणजे तत्कालीन भारताचे राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्या हस्ते ‘भूकंपग्रस्त आदर्श विद्यार्थी’ पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर उच्चशिक्षणासाठी दिली जाणारी अमेरिकेमधील विशेष फेलोशिप धारक आहेत. सद्या ते वरिष्ठ प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्याच बरोबर त्यांचा दुसरा मुलगा बळीराम प्रभाकर शिंदे हा महसूल खात्यामध्ये कार्यरत आहे. त्यांचा तिसरा मुलगा विष्णु शिंदे, सा. फु. पुणे विद्यापीठ मधून समाजशास्त्र या विषयात पी. एच. डी. करत आहे. विशेष बाब म्हणजे गेल्या वर्षी नॉर्वे येथील यु.एस.एन. या विद्यापीठातर्फे नार्वे या देशात जाऊन संशोधन करण्यासाठी त्यांना ‘इंटरनॅशनल मोबिलिटी फेलोशिप २०२३’ जाहीर झाली आहे. सद्या सा. फु. पुणे विद्यापीठामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. दोन मुली सविता आणि मनीषा या उच्चशिक्षण करून आता शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा उच्चशिक्षित लहान मुलगा सर्वांच्या पाठींब्याने व महापुरुषांनी सांगून गेल्याप्रमाणे ‘आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो’ या प्रेरणेतून स्फुर्ती घेऊन या पुरस्कार्थी मातेचे लेकरे आयसीड या सामाजिक संस्थेची स्थापना करून गरीब घरातील मुला-मुलींच्या शिक्षणासाठी भरीव मदत करत आहे.
सदर पुरस्कार मा. आ. राणा जगजितसिंह पाटील , मा. अॅड. मीरा कुलकर्णी आणि इतर मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला आहे. त्याचबरोबर या पुरस्कार वितरण कार्यक्रमास म. रा. शि. परिषद प्रांत अध्यक्ष मा. मधुकर उन्हाळे, भाजप धाराशिव अध्यक्ष मा. नितीनजी काळे, जिल्हा महिला आघाडी प्रमुख मा. पल्लवी पिसे , सौ. अंजली काळे,सौ. दिपाली काळे, सौ. दैवशाला हाके यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य शिक्षक महिला आघाडी धाराशिव जिल्हा शाखा पदाधिकारी सौ. ज्योती राऊत, सौ. ज्योती साकोळे, सौ. प्रमिला वाघे , सौ. रेखा डाके आणि माकणी गावतील आदर्श शिक्षक गौरीशंकर कलशेट्टी आदी उपस्थित होते.