न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

तीनशे तज्ञ डॉक्टरांसह सुसज्ज वैद्यकीय संकुल – पहिल्या टप्प्यात रु. 430 कोटी मंजूर, 31 एकर जागाही ताब्यात – – पाठपुराव्याला यश; आमदार राणाजगजितसिंह पाटील

पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

विकासावर बोलूया

तीनशे तज्ञ डॉक्टरांसह सुसज्ज वैद्यकीय संकुल

– पहिल्या टप्प्यात रु. 430 कोटी मंजूर, 31 एकर जागाही ताब्यात

– पाठपुराव्याला यश; आमदार राणाजगजितसिंह पाटील

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील मोक्याची 31 एकर जागा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी पदरात पाडून घेतली आहे. या ठिकाणी 300 तज्ञ डॉक्टर उपलब्ध असलेले सुसज्ज आणि सर्वात मोठे वैद्यकीय संकुल उभारण्याचे काम हाती घेतले आहे. पहिल्या टप्प्यात 430 कोटी रूपयांचा निधी देखील मंजूर झाला आहे. महाविकास आघाडीच्या त्रुटींमुळे रखडलेल्या प्रवेश प्रक्रियेला मान्यता मिळवून घेतली आणि प्रलंबित असलेल्या वैद्यकिय महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्नही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सहकार्याने निकाली काढला. आपल्या पाठपुराव्याला महायुती सरकारच्या पाठबळामुळे यश आले असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

आपल्या अनेक वर्षांच्या मागणीच्या अनुषंगाने तत्कालीन वैद्यकिय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी साल 2017 मध्ये धाराशिव येथे आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिरात शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाची घोषणा केली होती.त्यानंतरच्या हिवाळी अधिवेशनात तत्कालीन आ.सुजितसिंह ठाकूर यांनी विधानपरीषदेत व आम्ही विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केला होता त्याला उत्तर देताना गिरीश महाजन साहेबांनी वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याची सभागृहात घोषणा केली होती.त्यानुसार वैद्यकीय महाविद्यालयासाठी पूरक असणार्‍या सर्व अनुषंगिक बाबींची पूर्तता व्हावी यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अधिकृत ठराव घेवून 4 एकर जागा आपण वैद्यकीय महाविद्यालयासाठी मंजूर केली. एम.सी.आय.च्या अटींनुसार लागणारी जमीन उपलब्ध करून दिली. 30 कोटी रूपये खर्चून इमारत देखील बांधण्यात आली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक असलेला वस्तुनिष्ठ प्रस्ताव गिरीष महाजन यांच्याकडे सादर केला. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले आणि अनेक त्रुटी राहिल्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रियेवर गंडांतर आले. युती सरकार सत्तेत आल्यानंतर महाविकास आघाडीमुळे शिल्लक राहिलेल्या सर्व त्रुटी दूर करण्यासाठी प्रभावी उपाययोजना आखली. राष्ट्रीय आयुर्विज्ञान परिषदेची अर्थात एम.एन.सी.ची मान्यता मिळविली आणि शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये पुन्हा एकदा प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. आता या महाविद्यालयातून पहिली बॅच डॉक्टर होवून बाहेर पडेल.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीनंतरही जागेचा मुलभूत प्रश्न तसाच प्रलंबित होता. तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नाला आपण प्राधान्याने हातात घेतले. तत्कालीन ठाकरे सरकारकडे त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. मात्र धाराशिवकरांसाठी अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न सोडविण्याकडे ठाकरे सरकार आणि त्यांंच्या निष्क्रिय लोकप्रतिनिधींनी साफ दुर्लक्ष केले. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारकडे आपण जागेसाठी पुन्हा पाठपुरावा सुरू केला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी शहरातील शासकीय आयटीआय आणि जलसंपदा विभागाची जागा मिळावी याकरिता प्रयत्न सुरू केले. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गालगत असलेली मोक्याची जागा तत्कालीन शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून मंजूर करवून घेतली. कौशल्य विकास व जलसंपदा विभागाकडून जागेचा ताबा महसूल विभागाने शासकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. शिल्पा डोमकुंडवार यांच्याकडे ऑगस्ट महिन्यातच सोपविला आहे. विद्यार्थी, रूग्ण आणि रूग्णांच्या नातेवाईकांच्या दृष्टिने अत्यंत महत्वाची आणि सोयीची असणारी ही जागा मिळविण्यात आपल्याला यश आले आहे. काही जणांनी वैयक्तिक स्वार्थासाठी पोहनेर रस्त्यावरील दगडखानीजवळील अडगळीच्या जागेत वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. ते हाणून पाडत धाराशिवकरांच्या व्यापक हिताचा निर्णय घेण्यात आपल्याला यश आले असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले.

31 एकर जागेवर आधुनिक वैद्यकीय संकुल

जलसंपदा आणि तंत्रशिक्षण विभागाकडून वैद्यकीय शिक्षण विभागाकडे जागा हस्तांतरीत झाली आहे. या 31 एकर जागेवर आता 300 तज्ञ डॉक्टर उपलब्ध असलेले एक सुसज्ज आणि सर्वात मोठे वैद्यकीय संकुल उभारण्याचे काम आपण हाती घेतले आहे. महाविद्यालय आणि रूग्णालय इमारतीसाठी 430 कोटी रूपयांचा निधी देखील उपलब्ध झाला आहे. लवकरच या नवीन जागेवर अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे स्वप्न साकार होणार आहे. आपल्या महायुती सरकारच्या मदतीने प्रवेश प्रक्रियेस मान्यता मिळवून घेतली आणि वैद्यकीय शिक्षण संकुलासाठी राष्ट्रीय महामार्गालगत मोक्याच्या ठिकाणी 31 एकर जागा पदरात पाडून घेतली. मोठे स्वप्न पाहिले. आता ते साकारण्याच्या दृष्टिने महत्वपूर्ण पाऊल टाकले असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे