धाराशिव-तुळजापूर रेल्वेमार्गाचे सात किलोमीटरचे पायाभूत काम पूर्ण , दहा पोकलेन मशीन,८० हायवा टिप्पर आणि ३०० कामगार रात्रंदिवस कार्यरत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती.
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

धाराशिव-तुळजापूर रेल्वेमार्गाचे सात किलोमीटरचे पायाभूत काम पूर्ण , दहा पोकलेन मशीन,८० हायवा टिप्पर आणि ३०० कामगार रात्रंदिवस कार्यरत
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती.
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
धाराशिव-तुळजापूर या अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिलेल्या रेल्वेमार्गाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. १० पोकलेन मशीन, ८० हायवा टिप्पर आणि ३०० कामगारांच्या सहाय्याने रात्रंदिवस काम सुरू आहे. एकूण तीस किलोमीटर अंतराच्या रेल्वेमार्गापैकी सात किलोमीटरचे पायाभूत काम पूर्ण झाले आहे. कामच वेग असाच कायम राहिल्यास,आपण ठरविलेल्या उद्दिष्टानुसार पुढील २४ महिन्यांच्या आत कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्रापर्यंत रेल्वेमार्गाचे काम नक्की पूर्ण होईल असा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले तुळजापुर रेल्वेचे स्वप्न आता प्रत्यक्ष साकार होत आहे. एकूण ८४ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाच्या कामाचे तीन टप्पे करण्यात आले आहेत. धाराशिव ते तुळजापूर या पहिल्या टप्प्यातील ३० किलोमीटर ब्रॉडगेज रेल्वेमार्गाच्या कामास सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रारंभ झाला. वाहन व यंत्रांचे नारळ फोडून आपण पूजन केले होते. सध्या उपळा ते सांजा दरम्यान सहा किलोमीटर अंतराचे तर पळसवाडी परिसरात एक किलोमीटरचे पायाभूत काम पूर्ण झाले आहे. पुढील कामही मोठ्या वेगात सुरू आहे. या नवीन रेल्वेमार्गाचे काम खरतर २०१९ सालीच सुरू होणे अपेक्षित होते. मात्र त्यावेळी ठाकरे सरकारने राज्याच्या वाट्याचा पन्नास टक्के निधी उपलब्ध करून दिला नव्हता. त्यामुळेच अडीच वर्षे हे काम रखडले होते. राज्यात आपले महायुती सरकार आल्यानंतर या रेल्वेमार्गासाठी ४५२ .४६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे प्रत्यक्ष कामाला गती आली आहे. सुरूवातीला पाच वर्षात हे काम पूर्ण करण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र आता तीन टप्प्यांत कमी कालावधीत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्याचे काम प्रगतीपथावर आहे. उर्वरित दोन टप्प्यांचे कामही लवकरच हाती घेण्यात येणार असल्याची माहितीही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. पुढील दोन वर्षांच्या आत पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. ज्या गतीने आत्ता काम सुरू आहे, ते पाहता ठरविलेल्या उद्दिष्टानुसार नक्की काम पूर्ण होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पहिल्या टप्प्यातील कामासाठी धाराशिव तालुक्यातील नऊ आणि तुळजापूर तालुक्यातील १५ गावांमधील ४९४.२६ हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्यात आले आहे. पुढील टप्प्यात बोगद्याच्या कामांना हाती घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
एकूण अंतर 84 किलोमीटर;११० पूल आणि तीन मोठे उड्डाणपूल
सोलापूर-तुळजापूर-धाराशिव या एकूण ८४ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाचे तीन टप्पे करण्यात आले आहेत. त्यात धाराशिव जिल्ह्यातील कामाचे दोन स्वतंत्र टप्पे केले आहेत. या रेल्वेमार्गावर एकूण ११० पूल आणि तीन मोठे उड्डाणपूल असणार आहेत. सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील ३२ गावांतील एक हजार ३७५ एकर जमीन त्यासाठी भूसंपादीत करण्यात आली आहे. संपादीत जमिनीच्या वाढीव मावेजासाठी दोन्ही जिल्ह्यातील जिल्हाधिकार्यांची लवाद अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
धाराशिव-तुळजापूर ब्रॉडगेजसाठी ५४४ कोटींचा खर्च
पहिल्या टप्प्यातील ३० किलोमीटरच्या ब्रॉडगेज रेल्वेमार्गासाठी ५४४ कोटी रूपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. जास्तीत जास्त २४ महिन्यांच्या आत हा रेल्वेमार्ग पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. या मार्गावर सांजा, वडगाव आणि तुळजापूर, असे तीन नवीन रेल्वेस्थानक उभारले जाणार आहेत. या रेल्वेमार्गामुळे तुळजाभवानी देवीचे तीर्थक्षेत्र रेल्वेच्या राष्ट्रीय नकाशावर येणार आहे.
तीन नवीन रेल्वेस्थानक
धाराशिव-तुळजापूर या ३० किलोमीटर रेल्वेमार्गावर तीन नवीन रेल्वेस्थानके उभारली जाणार आहेत. धाराशिव ते सांजा या १० किलोमीटर अंतरावर सांजा येथे पहिले रेल्वे स्थानक असणार आहे. सांजा ते वडगाव या १२ किलोमीटर अंतराच्या टप्प्यावर दुसरे रेल्वेस्थानक तर वडगाव ते तुळजापूर या आठ किलोमीटर अंंतरावर तिसरे स्थानक उभारले जाणार आहे. या रेल्वेमार्गावर एकूण चार स्थानके असणार आहेत. त्यात धाराशिव येथील सध्या अस्तित्वात असलेल्या मुख्य रेल्वेस्थानकाचाही समावेश आहे. मुख्य रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासासाठी नुकतेच नरेंद्र मोदी यांच्या सरकारने २१ कोटी रुपयांचा निधी सुपूर्द केला असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.