पेट्रोल पंपावर सुविधेचा अभाव,पेट्रोेल पंपावरील सेवा उरल्या फक्त कागदावरच ..!
Post- गणेश खबोले

लोहारा-प्रतिनिधी
शहरातील पेट्रोल पंपांवर कंपनीने निश्चित केलेल्या सुविधा वाहनधारकांना पुरविल्या जात नसल्याचे चित्र दिसत आहे.पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल भरणाऱ्या ग्राहकांना मोफत हवा,पाणी,शौचालयाची व्यवस्था करणे पेट्रोल पंप मालकांना अनिवार्य आहे.परंतु लोहारा शहरामधील पेट्रोल पंपांवर मूलभूत सुविधा पैकी काही ठिकाणी पाणी तर काही ठिकाणी हवा आणि शौचालयाच्या सुविधांचा अभाव असल्याचे आढळून आले.
लोहारा शहरामध्ये तीन पेट्रोल पंप पैकी वेगवेगळ्या कंपन्यांचे दोन पेट्रोल पंप आहेत.या पेट्रोल पंपांची पाहणी केली असता अनिवार्य सेवा देण्यात येत नसल्याचे चित्र आहे.पेट्रोल पंपावर मोफत हवा देणे बंधनकारक आहे.ग्राहक पेट्रोल पंपावर पेट्रोल किंवा डिझेल भरण्यासाठी गेल्यानंतर तो गाडीत मोफत हवा भरून घेऊ शकतो.काही ठिकाणी पेट्रोल पंपांवर मोफत हवा भरण्यासाठी मशीन बसविण्यात आल्या आहेत.परंतु ते एक महिन्यापासून मशीन बंद असल्याचे कर्मचाऱ्यां कडून सांगण्यात आले.
पिण्याच्या पाण्याची सोय करणे बंधनकारक आहे.परंतु शहरातील सर्व पेट्रोल पंपावर पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आलेली आहे पण काही ठिकाणी फिल्टर बंद स्वच्छतेचा अभाव आहे.पेट्रोल पंप मालक/मॅनेजर स्वतःसाठी थंड जारची व्यवस्था करतात ही दिसते.पण ग्राहकांना काय असा प्रश्न निर्माण होत आहे.
महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र्य स्वच्छतागृह असणे बंधनकारक आहे.लोहारा येथे पेट्रोल पंपावर स्वच्छतागृह आहेत.परंतु काही पंपावर पाण्याची सोय नाही.त्यामुळे स्वच्छतागृह असून ते केवळ दाखविण्यासाठीच असल्याचे दिसून येते.सुविधांचा अभाव असतांना प्रशासनाला मात्र हे दिसत नाही.
प्रत्येक पेट्रोल पंपावर प्रथमोपचार पेटी (फर्स्ट एड बॉक्स) ठेवणे आवश्यक आहे.त्याकडे ग्राहक जास्त लक्ष देत नाहीत.परंतु आपत्कालीन व्यवस्था असणे महत्त्वाचे आहे.दररोज च्या मूलभूत गरजा हवा,पाणी याकडे मॅनेजर दुर्लक्ष करत असतात तर प्रथमोपचार बाबत विचार करणे हे वेगळे ठरेल.
पेट्रोल पंपावर मोबाईल वर बोलण्यावर निषिद्ध असतांना सर्वच कर्मचारी सर्रास मोबाईलचा वापर करतात.पंपावर लोकांना ब्रम्हज्ञान सांगणाऱ्या कर्मचाऱ्यांनी नियम पायदळी तुडवून जिवघेणा खेळ सुरू केल्याचे आढळून येते.यामुळे सर्वसामान्यांच्या जीविताची सुरक्षा करण्याची जबाबदारी कोणाची? पेट्रोलपंप चालकांची का सुस्त शासकीय यंत्रणांची व निष्क्रिय अधिकाऱ्यांची? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे.
———————–—————————— ———–
सर्व पेट्रोल पंपावर सोयी सुविधा बाबत अधिकारी प्रत्यक्ष जाऊन पडताळणी करतात कि केवळ कागदोपत्री पडताळणी करतात ? हाही एक प्रश्नच आहे.पेट्रोल विकणार्याकडे संबंधित अधिकारी,भरारी पथक,पुरवठा अधिकारी,स्थानिक प्रशासकीय अधिकारी यांचे दुर्लक्ष आहे.त्यामुळे नागरिकांना त्रास सोसावा लागत आहे.
बाळासाहेब कोरे
मा.नगरसेवक लोहारा