एकलव्या प्रमाणे ध्येयावर निष्ठा ठेवा – दत्ताभाऊ कुलकर्णी ब्राह्मण कल्याण ट्रस्टच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव

एकलव्या प्रमाणे ध्येयावर निष्ठा ठेवा – दत्ताभाऊ कुलकर्णी
ब्राह्मण कल्याण ट्रस्टच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव
धाराशिव/न्यूज सिक्सर
येथील ब्राह्मण कल्याण ट्रस्टच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर जनता बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ शिक्षण तज्ञ शेषाद्री डांगे, श्री. सिध्दीविनायक परिवाराचे अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
येथील परिमल मंगल कार्यालयात सकाळी साडेदहा वाजता या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात इयत्ता १० वी व १२ वी तसेच संघटनेच्या वतीने वर्षभरात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धातील विजेत्यांचा सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. यावेळी वेदमुर्ती शेखर कुलकर्णी यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन व विद्येची देवता सरस्वतीचे पुजन करुन करण्यात आली. प्रास्ताविक मुकूंद भातंब्रेकर यांनी केले. यावेळी मार्गदर्शन करताना सुनील पेंडसे म्हणाले की, आजची युवा पिढी ही सोशल मिडीयाच्या आहारी गेली आहे. फेसबुकवर हजारो मित्र असण्यापेक्षा प्रत्यक्षात पाच मित्र असणे महत्वाचे आहे, विद्यार्थ्यांनी समाजात मिसळावे, पुस्तकाशी मैत्री करावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच मला हे जमंल नाही, ते तु पूर्ण कर अशी अपेक्षा पालकांनी आपल्या पाल्याकडून करु नये असा सल्लाही त्यांनी उपस्थित पालकांना दिला.
यावेळी बोलताना जेष्ठ शिक्षणतज्ञ शेषाद्री डांगे म्हणाले की, शिक्षण पध्दती बदलत आहे. अभ्यासा बरोबरच विद्यार्थ्यांनी इतर कौशल्य विकसीत करणे गरजेचे आहे. नौकरीच्या मागे न लागता दुसर्याना नौकरी देणारे बना, केवळ मार्क हेच जीवनात यशस्वी होण्याचे सुत्र नाही, भविष्यात काय व्हायचे हे तुम्हीच ‘रवा असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विपीन गंधोरकर तर आभार संतोष बडवे यांनी मानले. कार्यक्रमाला गुणवंत विद्यार्थी, पालक, समाजबांधव मो’्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
एकलव्या प्रमाणे ध्येयावर निष्ठा ठेवा – दत्ताभाऊ कुलकर्णी
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना दत्ताभाऊ कुलकर्णी म्हणाले की, एकलव्य ज्या प्रमाणे स्वयं अध्ययन करुन शिकला, त्याने जगातील सर्वोत्तम धर्नुधर होण्याचे ध्येय ठेवले व आपल्या कष्टाने ते साध्य केले. त्याच प्रमाणे विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करुन त्या ध्येयावर निष्ठा ठेवून जर त्या दिशेने मार्गक्रमण केले तर विद्यार्थी हमखास यशस्वी होवू शकतो. तसेच विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्याबरोबरच उत्तम नागरीक होणं महत्वाचं असल्याचेही ते म्हणाले.