श्री तुळजाभवानी मंदीर धार्मिक व्यवस्थापक पदाची संगीतखूर्ची रद्द करा- मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे

श्री तुळजाभवानी मंदीर धार्मिक व्यवस्थापक पदाची संगीतखूर्ची रद्द करा- मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे
तुळजापूर /न्यूज सिक्सर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांनी जिल्हाधिकारी तथा तुळजाभवानी मंदीर समितीचे अध्यक्ष यांना निवेदन दिले असुन,दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ,
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी च्या दर्शनासाठी संबंध देशातुन लाखो भाविक दर्शनासाठी तुळजापूर येथे येतात . यामुळे येथील भाविकांची गर्दी वरचेवर वाढत चाललेली आहे . या भाविकांना तुळजाभवानी मंदीरात सर्व सुविधा मिळणे गरजेचे असुन त्यांची हेळसांड होता कामा नये. याकडे आपणांसह मंदीर समितीने जातीने लक्ष देण्याची गरज असताना आपण तुळजाभवानी मंदीरातील धार्मिक व्यवस्थापक पदासाठी संगीत खूर्चीचा खेळ निर्माण करून आपल्या आदेशाने या पदाचा कार्यकाळ केवळ ४ महिन्यांचा करण्यात आला आणि यासाठी मंदीरातील ३ कर्मचार्यांची ४ महिन्यांच्या फेराफेराने नियुकी करण्यात आली .
या निर्णयामुळे मंदीर व्यवस्थापनाचा कारभार ढिसाळ होणार आहे . सदर ४ महिन्यांच्या कार्यकाळात भाविकांच्या हितासाठी कोणतेही दूरगामी निर्णय संबंधित धार्मिक व्यवस्थापकास घेता येणार नाहीत . एखाद्या व्यवस्थापकाने घेतलेला निर्णय लगेच ४ महिन्यांत पदभार घेणार्या दुसऱ्या व्यवस्थापकाने तो निर्णय बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही . यामुळे दर्शनासाठी येणा-या लाखो भाविकांची हेळसांड होणार आहे .
शासनाच्या सेवेतील अधिका-यांचा एका ठिकाणचा कार्यकाळ हा ३ वर्षांचा असतो . याप्रमाणेच तुळजाभवानी मंदीरातील धार्मिक व्यवस्थापक पदावरील कर्मचा-याचाही कार्यकाळ हा किमान ३ वर्षांचा करणे योग्य राहिल .
तरी आपण घेतलेला तुळजाभवानी मंदीर धार्मिक व्यवस्थापक पदाच्या संगीतखूर्चीचा निर्णय तात्काळ रद्द करून शासनाच्या नियमा प्रमाणे याही ठिकाणी धार्मिक व्यवस्थापक पदाचा कार्यकाळ किमान ३ वर्षांचा करण्याबाबत तात्काळ नव्याने आदेश काढावा अशी मागणी केली आहे . या निवेदनाची प्रत मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व विभागीय आयुक्त यांना पाठवण्यात आली आहे .