पत्रकार चषक क्रिकेट स्पर्धेत नागोठणे संघ अंतिम तर गोरेगाव संघ उपविजेता

अलिबाग :-अमूलकुमार जैन
अलिबाग प्रेस असोसिएशनतर्फे आयोजित स्पर्धा
अलिबाग प्रेस असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार चषक क्रिकेट स्पर्धेत नागोठणे संघाने विजेतेपद मिळवून पत्रकार चषक पटकावला. गोरेगाव संघ उपविजेता ठरला. महाड व कर्जत संघ उपांत्य उपविजेते ठरले.
रायगड जिल्ह्यातील पत्रकारांची क्रिकेट स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल नेहुली – अलिबाग येथे खेळविण्यात आली. अंतिम फेरीत नागोठणे संघाने गोरेगाव संघाचा पराभव केला. पहिल्या उपांत्य सामन्यात नागोठणे संघाने कर्जत संघाचा पराभव केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात महाड संघाचा पराभव करून गोरेगाव संघाने अंतिम फेरी गाठली.
नागोठणे संघाचा गणेश गोरे याला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू गौरवण्यात आले. गोरेगाव संघाचा वैभव टेंबे याची उत्कृष्ट गोलंदाज म्हणून तर कर्जत संघाचा तुषार जोशी याची उत्कृष्ट फलंदाज म्हणून निवड करण्यात आली. रोहा संघाला शिस्तबद्ध संघ म्हणून गौरवण्यात आले. पेण संघाला आकर्षक गणवेशाचे बक्षीस देण्यात आले.
अलिबागचे माजी नगराधाक्ष प्रशांत नाईक, रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, एल सी बी चे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, प्रांताधिकारी प्रशांत ढगे, अप्पर जिल्हाधिकारी अमोल यादव, महसूल चिटणीस सचिन शेजाळ, वेश्वी ग्रामपंचायत सरपंच गणेश गावडे, रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्रदीप नाईक, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्पर्धा समितीचे सदस्य प्रकाश पावसकर यावेळी उपस्थित होते. रायगड पोलीस विरुद्ध महसूल विभाग असा प्रदर्शनीय सामना खेळविण्यात आला होता.यामध्ये महसूल विभागाने रायगड पोलीस दलावर विजय मिळविला .
सर्वपक्षीय राजकीय नेते विरुद्ध अलिबाग पत्रकार असा दुसरा प्रदर्शनीय सामना खेळविण्यात आला .
स्पर्धेचे पारितोषिक वितरण रायगडचे खासदार सुनील तटकरे,आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.सनदी लेखापाल संजय राऊत, माजी सरकारी वकील एड. प्रसाद पाटील, ज्येष्ठ पत्रकार देवदास मटाले, अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शैलेश सणस, आशिष भट आदी यावेळी उपस्थित होते.