महापुरुषाच्या विचारात देश घडविण्याची ताकत आहे – जेष्ठ विचारवंत प्राचार्य डाॅ.सोमनाथ रोडे
Post - गणेश खबोले

उमरगा / प्रतिनिधी
स्मृतीशेष रामलिंगप्पा वैरागकर सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने महात्मा फुले पुरस्कार वितरण
‘महापुरूषांच्या विचारात देश घडविण्याची ताकत’ असे उद्गार जेष्ठ विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते प्राचार्य डाॅ.सोमनाथ रोडे यांनी काढले. ते येथे स्मृतीशेष रामलिंगप्पा वैरागकर सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने उमरगा येथे आयोजित महात्मा फुले पुरस्कार वितरण प्रसंगी बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवशंकर (तम्मा) माळगे हे होते. श्री.सुभाष वैरागकर यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाच्या आयोजनामागची भुमिका मांडली. प्रा.रोडे पुढे बोलताना म्हणाले की आपणांस बलशाली आणि समृद्ध भारत निर्माण करायचा असेल तर महापुरूषांच्या जीवन आणि कार्याचा आदर्श समोर ठेऊन वाटचाल करावी लागेल. आजच्या तरुणांमध्ये प्रचंड आत्मबल आहे पण त्याचा सदुपयोग चांगल्या कामासाठी व्हावा यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
शिक्षणामुळे मोठी क्रांती होते. ती ताकद शिक्षणात आहे मात्र दुर्देवाने शिक्षणासाठी राष्ट्रीय उत्पन्नाच्या केवळ साडेतीन टक्के खर्च करण्यात येतो.महापुरुषाच्या विचाराने देश महाशक्ती होईल पण माणूस हा लेखणीचा केंद्रबिंदु झाला पाहिजे तरच सर्वसामान्य माणसांना न्याय मिळेल.
या प्रसंगी जेष्ठ पत्रकार श्री जयप्रकाश दगडे यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की समाजातील विसंगती आणि विकृती दूर करण्याचे काम पत्रकारांनी करणे आवश्यक आहे.
पत्रकारितेमध्ये समाज घडविण्याची आणि समाजात बदल घडविण्याची ताकत असते.यासाठी पत्रकारांनी आपल्या लेखनीचा वापर जबाबदारीने करावा. यावेळी श्री.मल्हारी माने आणि श्री.अमर सुर्यवंशी यांनीही मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी डाॅ.दा.ब.पतंगे ,व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्री. रणधीर पवार, कार्याध्यक्ष श्री. नितीन होळे,अँड.प्रविण तोतला, प्राचार्य दिलीप गरूड,डाॅ.प्रसाद स्वामी , श्री. बाबु स्वामी,श्री सिद्रामप्पा चिंचोळे, डाॅ.किरण सगर,डाॅ.राजेंद्र कानडे, श्री. अभय हिरास ,प्राचार्य भिमाशंकर सारणे,प्राचार्य मन्मथ माळी, श्री पद्माकर मोरे,श्रीम कस्तुरबाई वैरागकर आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन श्रीमती कालिंदी डिंगरे व श्री. प्रविण स्वामी यांनी केले. तर श्री. श्रीशैल्य बिराजदार यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीम.सरिता उपासे,संजय वैरागकर, शुभम वैरागकर,जयंत उपासे, सुर्यकांत वैरागकर, गिरीजाकांत वैरागकर शिवानंद माशाळकर, दत्तात्रय लांडगे, आदींनी परिश्रम घेतले.
यांचा झाला सत्कार
महात्मा जोतिबा फुले स्मृती जीवन गौरव पुरस्कार प्रा.डाॅ. सोमनाथ रोडे आणि प्राचार्य शिवमूर्ती भांडेकर ,जेष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे यांना महात्मा जोतिबा फुले स्मृती पत्रकारिता पुरस्कार,श्री.अमर सुर्यवंशी यांना महात्मा फुले स्मृती सरपंच पुरस्कार ,श्री शिवप्रसाद लड्डा यांना महात्मा फुले स्मृती उद्योजक पुरस्कार,श्री. बालाजी बिराजदार यांना महात्मा फुले स्मृती ग्रामीण पत्रकार पुरस्कार,श्री मल्हारी माने यांना महात्मा फुले स्मृती अधिकारी पुरस्कार, महात्मा फुले स्मृती साहित्य पुरस्कार श्री. फारूक काजी व महात्मा फुले स्मृती शिक्षक पुरस्कार अनुक्रमे – सदाशिव शिंदे,(तुळजापूर) वर्षा शेटकार (लोहारा ), राम आरडले (कळंब), पी.डी.सोमवंशी,(उमरगा) पुष्पलता पांढरे(उमरगा ) सविता मोरे (वाशी), बबिता अंबुरे (उस्मानाबाद)