विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकच खरे शिल्पकार -शिक्षण उपसंचालक गणपतराव मोरे

विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकच खरे शिल्पकार -शिक्षण उपसंचालक गणपतराव मोरे
15 आदर्श शिक्षकांचा सावित्री – ज्योतिबा फुले पुरस्काराने सन्मान
मंगरूळ /चांदसाहेब शेख
तुळजापूर तालुक्यातील यमगरवाडी येथे जिल्हा परिषद शिक्षण विभाग धाराशिव अंतर्गत मंगरुळ बीटच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या 15 शिक्षकांना व गुणवंत विद्यार्थ्यांना लातूर विभागाचे शिक्षण उपसंचालक डॉ.श्री गणपतराव मोरे, धाराशिव जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.दयानंद जटनूरे यांच्या हस्ते मंगरुळ बीट स्तरीय सावित्री-ज्योतिबा फुले शिक्षक पुरस्काराने 15 शिक्षकांना गौरविण्यात आले. तसेच नियतवयोमानानूसार मंगरुळ जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका नागरबाई सोनार यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करण्यात आला.
हा पुरस्कार वितरण सोहळा तुळजापूर तालुक्यातील यमगरवाडी-मंगरुळ विद्या संकूलात शानदार कार्यक्रमात प्रदान करण्यात आले.
यावेळी प्रस्ताविकात मंगरुळ बीटचे विस्तार अधिकारी मल्हार माने यांनी मंगरुळ बीट अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली.
यावेळी लातूर विभागाचे शिक्षण उपसंचालक गणपतराव मोरे यांनी मंगरुळ बीटचे विस्तार अधिकारी मल्हार माने यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येत असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. पुढे बोलताना ते म्हणाले की, शाळेचा दर्जा हा शिक्षकाच्या दर्जावर अवलंबून असतो. शिक्षण विषयक कुठल्याही योजनेच्या केंद्रस्थानी शिक्षकच असतो. कोणतीही शिक्षण योजना शिक्षका शिवाय राबविली जाऊ शकत नाही. विदयार्थ्यांचा कल, त्यांची आवड व त्यांच्यातील क्षमता ओळखून त्याला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शिक्षक योग्य मार्गदर्शन करू शकतात. स्वत:च्या आयुष्यात नैतिक मूल्याचे आचरण करून समाजासमोर आदर्श मांडणारे शिक्षक एका अर्थाने समाजालाच घडविणारे शिल्पकार टिकवून ठेवण्यास शिक्षकांची भूमिका अत्यंत निर्णायक शिकवण शिक्षक रुजवू शकतो. सावित्री-ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.
आपल्या अध्यक्षीय भाषणात उस्मानाबाद जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. दयानंद जटनूरे यांनी पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा शिक्षकांचे कौतुक करीत आपल्या मागील शिक्षक पदावरील कामाविषयीच्या आठवणींना उजाळा देताना शिक्षण क्षेत्रातील कामाच्या बाबतीतील आठवणी सांगितल्या. जिल्ह्यात 12 ते 13 फाऊंडेशन काम करीत असल्याचे सांगून शिक्षण क्षेत्रात काही अडचणी असतील तर त्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था कार्यरत असल्याचे सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले की, एक उत्तम विद्यार्थी घडविणे हे शिक्षकांचे काम आहे. त्यांचे उज्ज्वल भविष्य हीच शिक्षकांच्या कार्याची पोचपावती आहे. पुरस्काराचा विचार न करता विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी शिक्षकांनी प्रयत्नशील राहावे. मंगरुळ बीटचे कौतुक करत मंगरुळ बीट अंतर्गत येणाऱ्या शिक्षकांचे कार्य खरोखरच कौतुकास्पद असल्याचे मत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य दयानंद जटनूरे यांनी व्यक्त केले.
——————————————-
**गायकवाड शांताराम गणपती येवती,श्रीमती गायकवाड वासंती उमाजी कुंभारी , श्रीमती जवळेकर स्वाती संगप्पा आरळी बु., नवले स्मिता हरिषचंद्र, धोत्री , श्रीमती काळे सुवर्णा गोवर्धन दिंडेगाव , ढंगे विकास कल्लिनाथ काटगाव , फरताडे अजीनाथ साहेबराव इंदिरा नगर चिवरी, आदटराव माळस रघुनाथ, कसई , श्रीमती वैद्य विशाखा विनायकराव पुजारी नगर चिवरी श्रीमती हेरकर सविता महारुद्र मंगरुळ
, शिंदे रामचंद्र नारायण बसवंतवाडी
, गोरसे पोपट हरिदास नांदुरी
, श्रीमती देशमुख सुषमा रामचंद्र चव्हाणवाडी , गायकवाड अनिल सुग्रीव आश्रमशाळा मंगरुळ, मगर अण्णासाहेब बाबुराव यमगरवाडी
या 15 शिक्षकांना सावित्री-ज्योतिबा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले*
——————————————
यावेळी बिटमधील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.