
उमरगा (प्रतिनिधी) चेतन पवार
उस्मानाबाद : उमरगा तालुक्यातील आलूर येथील ज्योती तांडा येथे संत सेवालाल महाराज यांची २८४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे माजी ग्रामपंचायत सदस्य, गुलाब राम राठोड यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने समाज बांधवांनी महाप्रसादाचे देखील आयोजन केले होते. गेल्या काही वर्षांपासून येथील बंजारा समाज बांधव एकत्र येऊन मोठ्या उत्साहात संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करतात. जयंती निमित्ताने प्रत्येकाच्या घरावर सेवालाल महाराजांचे ध्वज लावण्यात आले होते. यासह मिरवणूक देखील काढण्यात आली होती.
संत सेवालाल महाराज चौकाचे अनावरण व ध्वजारोहण करतांना उपस्थित सर्व मान्यवर
संत सेवालाल महाराज हे एक महान
■ मानवतावादी संत गोरबंजारा समाजामध्ये होऊन गेले. त्यांचा जन्म १५ फेब्रुवारी १७३९ रोजी आंध्र प्रदेशात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भीमा नाईक तर आईचे नाव धरमणी होते. हे कुटुंब पशुपालक कुटुंब होते. भीमा नाईक यांना चार पुत्र होते. यापैकी संत सेवालाल महाराज हे ज्येष्ठ होते. सुरूवातीपासून ते विरक्त व निर्मोही स्वभावाचे होते. त्यामुळे सेवालाल महाराजांनी समाज सुधारण्याचे कार्य हाती घेतले. संत सेवालाल महाराजांनी समाजातील कुप्रथा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मानवतेचा व पर्यावरण संरक्षण संदेश दिला. धर्मरक्षणासाठी त्यांनी युद्ध देखील केले.
संत सेवालाल महाराज यांची शिकवण
■ संत सेवालाल महाराज यांनी समाजातील चालीरिती, वाईट प्रवृत्ती व अंधश्रध्दा घालवून बंजारा समाजात आत्मसन्मान निर्माण केला. पशुहत्या, बालविवाह, मद्यपान या सारख्या वाईट प्रवृत्तींबाबत समाजाचे प्रबोधन केले. तसेच त्यांनी गोर बोलीभाषा, सण, उत्सव व संस्कृती जतन करण्याची शिकवण दिली. सेवाभावाने समाजाच्या उद्धारासाठी कार्य करण्याचा संदेश दिला.
■ समाजातील भोळ्या समजुती अंधश्रद्धा व्यसनाधिनता, भूतदया निसर्गप्रेम, स्वकर्तृत्वावर विश्वास, सत्य, अहिंसा, आदी विषयी महान विचार वचने, दोहे, कवणे व भजने वा स्वरुपात प्रकट झाले आहेत. सत्य हाच खरा धर्म आहे नेहमी सत्याची आचरण करावे असे क्रांतिकारी व अमृततुल्य विचार संत सेवालाल महाराज यांचे आहे शिवाय त्यांच्या पुरोगामी आदर्श विचारामुळे बंजारा समाज प्रगती करत आहे, असे मत सेवालाल महाराज जयंतीच्या निमित्ताने, माजी ग्रामपंचायत सदस्य गुलाब राम राठोड यांनी व्यक्त केले.
पारंपरिक वेशभूषा
■ यावेळी बंजारा समाजातील महिलांनी व मुलींनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
■ संत सेवालाल महाराज यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला व बंजारा बोलीचा गोडवा आपल्या सुमधुर आवाजातून व्यक्त केला. पुढे बोलतांना रामराम जेऊरे, यांनी महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाते. महाराष्ट्राच्या मातीला जसा त्यागाचा, पराक्रमाचा वारसा आहे तसेच संतांच्या विचारांचा गंधही आहे. महाराष्ट्रभूमीत अनेक जाती धर्माच्या साधू-संत व प्रबोधनकार कीर्तनकारांनी जन्म घेतला आहे. शिवाय महाराष्ट्राची जडणघडणच संतांच्या विचारातून झालेली आहे. त्यांच्या शिकवणीमुळे संपूर्ण समाज गुण्यागोविंदाने नांदत आहे समाजातील वाईट चालीरीती अज्ञान जाती व्यवस्था नष्ट करण्याचे महान कार्य संत मंडळींनी केले. तसेच बंजारा समाजाचे सुप्रसिद्ध संत सेवालाल महाराजांचे विचार सुद्धा मानवतावादी शिकवण देणारे आहेत असे सांगितले. संत सेवालाल महाराजांची महिलांनी आरती गायली.
मिरवणूकीदरम्यान सेवालाल महाराज की जय या जयघोषाने ज्योती तांडा परिसर दुमदुमून गेला होता. तसेच संत सेवालाल महाराज चौकाचे अनावरण व ध्वजारोहण करण्यात आले. संत सेवालाल चौक अनावरणाच्या वेळी, आलूर नगरीचे, सरपंच रामराम जेऊरे, माजी जिल्हा परिषद सदस्य, प्रकाश वाकडे, परवेज सौदागर, समाजसेवक, राजेंद्र मटंगे, ग्रामपंचायत सदस्य, ऋषिकेश स्वामी, रेवणय्या स्वामी, सिद्धप्पा ब्याळीकुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. व पंचक्रोशीतील बांधवांनी हजेरी लावली. चौकाचे अनावरण मोठ्या संख्येने व जल्लोषात करण्यात आले. संत सेवालाल महाराज जयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी, गुलाब राठोड, धारू पवार, घनू पवार, शंकर चव्हाण, राजू राठोड, यल्लाप्पा राठोड, संजय पवार, गणेश राठोड, रोहिदास पवार, शिवाजी पवार, उमलू राठोड, अशोक राठोड, पुजारी शिवाजी पवार, भीमू चव्हाण, उमेश चव्हाण, सचिन चव्हाण आदींनी परिश्रम घेतले. बबलू चव्हाण, सतीश पवार, रोहित राठोड, शिवाजी राठोड, विशाल पवार, स्वप्निल राठोड, आनंद आडे, विठ्ठल राठोड, राहुल चव्हाण, मोतीराम राठोड, नितीन राठोड यांच्यासह आदी बंजारा समाज बांधवांनी परिश्रम घेतले.